

Fight broke out after being asked to answer about taking a girl's photo
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोर असलेल्या संसारनगर परिसरात शेकोटीजवळ बसलेल्या मुलींचे टोळक्याने मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा जाब विचारल्याने ३५ ते ४० जणांच्या जमावाने एका अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. इथे दिसलात तर कापून टाकू, अशा धमक्या देत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मुलींना बलात्काराच्या धमक्या दिल्या. ही गंभीर घटना रविवारी (दि. ७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
संसारनगर येथील ४४ वर्षीय फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ६ डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या घरासमोर त्यांच्या तीन मुली आणि त्या मुलींची मैत्रीण अशा शेकोटी करून बसलेल्या होत्या. त्यावेळी काही टवाळखोरांनी तेथून जाताना या मुलींचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हा प्रकार त्याच्या मुलाने पाहिला, पण त्यावेळी फोटो काढणारे पळून गेले होते.
रविवारी (दि.७) रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या मुलाने पुन्हा त्याच टवाळखोरांना पाहिले. त्याने त्यांना काल फोटो का काढले, अशी विचारणा केली. या प्रश्नामुळे संतापलेल्या टवाळखोरांनी आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले आणि त्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली.
ही घटना समजताच फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय वाद सोडवण्यासाठी घटनास्थळी आले. त्यावेळी तिथे ३५ ते टवाळखोरांच्या जमावाने त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली. ४० एवढेच नव्हे, त्यांनी घरातील मुलींनाही थेट बलात्काराच्या धमक्या दिल्या आणि इथे पुन्हा दिसलात तर कापून टाकू, अशी धमकी देऊन तेथून पसार झाले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.