

373 MW solar projects commissioned in the circle
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात १८३ उपकेंद्रांमध्ये १०८४ मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. त्यापैकी आजपर्यंत ६४ उपकेंद्रांत ३७३ मेगा वॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प कार्यन्वित झाले आहेत. यातून परिमंडलातील सुमारे ७६ हजार २७९ शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिपंपासाठी दिवसा वीज मिळत असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी दिवसा आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा आणली आहे. यातून मिळणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संभाजीनगर परिमंडलात १८३ उपकेंद्रांमध्ये १०८४ मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. आजघडीला यापैकी ६४ उपकेंद्रांमध्ये ३७३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ उपकेंद्रामध्ये २३४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये तयार झालेली वीज १११ फिटरद्वारे संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ हजार ३८९ कृषी पंपांना दिवसा पुरवली जात आहे.
जालना जिल्ह्यातील लाभार्थी
जालना जिल्ह्यात आज पर्यंत २९ उपकेंद्राअंतर्गत १३९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहेत या उपकेंद्रांमधील ७८ फिडरद्वारे जालना जिल्ह्यातील २७ हजार ८९० कृषी पंपांना दिवसा वीज पुरवली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये दिवसा वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे रात्री सिंचनासाठी शेतात जाण्याचे कष्ट वाचले आहेत.
१८३ उपकेंद्रांत नियोजन
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात १८३ उपकेंद्रांमध्ये १०८४ मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११२ उपकेंद्रांमध्ये ७४३ मेगावॅट तर जालना जिल्ह्यामध्ये ७१ उपकेंद्रांमध्ये ३४१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी देण्यात येणार असल्याचीही माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.