

More than 1.5 lakh farmers get daytime electricity
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या योजनेचा छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सुमारे १ लाख ५१ हजार ५४९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. सौरपंपामुळे शेती सिंचनासाठी दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना छत्रपती संभाजीनगर परिमंडलात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. आजपर्यंत या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५ हजार ७१३ तर जालना जिल्ह्यात ९५ हजार ६३६ असे दीड लाखा पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी या सौर कृषिपंपाचा लाभ घेतला आहे.
राज्यात ७ लाख ५० हजार सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात तब्बल १ लाख ५१ हजार ५४९ कृषी पंप बसवले गेले आहेत. या पंपातून शेतकरी दिवसा वीज वापरत आहेत. त्यामुळे त्यांची रात्री अपरात्री शेतात जाण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना सरकारकडून ९० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ १० टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. सौर पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही.
सौरउर्जेमुळे पर्यावरणाचे रक्षण
शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीजप- रवठ्यावर अवलंबून राहत नसल्याने त्यांना हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळाले. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येत आहे. पिंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.