

2,800 birth certificates issued from the Ghati cancelled!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) देण्यात आलेली २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. विलंबित जन्म प्रमाणपत्रे देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तसे आदेश प्राप्त करून घेणे गरजेचे असते. परंतु अशा आदेशांविनाच घाटीतून परस्पर ही प्रमाणपत्रे दिली गेली. आता ही सर्व प्रमाणपत्रे परत घेण्यात येणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या मुद्द्द्यावर सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांची भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महसूल विभागाच्या अधिकऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाईसाठी सोमय्या हे सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत.
सोमवारच्या बैठकीत प्रशासनाने त्यांना आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. घाटीतून एकूण ४९०० जन्म प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पडताळणीनंतर त्यातील २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. आता ही प्रमाणपत्रे परत घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक समिती नियुक्त केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
सिल्लोडमध्ये २३४ जणांविरोधात कारवाई
जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी जिल्हा प्रशासनाने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. त्यातून बर्याच गोष्टी समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर एसडीएम यांनी चौदाशे अर्ज मान्य केले होते, त्यांचे पुनर्निरीक्षण करून दोनशे अर्जदारांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५० जणांवर एफआयआर दाखल झाले असून उर्वरित तीस, चाळीस जणांवर लवकरच एफआयआर दाखल होणार आहे. सिल्लोडमध्ये २३४ जन्म प्रमाणपत्र लाभार्थीविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय तेथील एसडीएमने घेतला आहे, असे किरीट सोमय्या यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.