

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात गुरुवारपासून (दि. १०) मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत शिबीर सुरू राहणार असून यात नागरिकांना कुणबी नोंदी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत वर्षभरात २६ हजार ५४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २५ हजार ९५८ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
मराठवाड्यात कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कुणबी नोंदीच्या याद्या ७ सप्टेंबरपासून ग्रामपंचायतनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या संकेत स्थळावरही या नोंदी एका क्लिकवर नागरिकांना पाहता येणार आहेत.
मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी न्या. संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ५४ जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. त्यातील २५ हजार ९५८ जणांना प्रमाणपत्रे वितरित झाले. तर ९४ अर्ज नामंजूर झाले आहेत. सध्या केवळ २ अर्जच प्रलंबित आहेत. विशेष शिबिरांमध्ये नागरिकांनी उपलब्ध नोंर्दीची पाहणी करून प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गंगापुरात सर्वाधिक प्रमाणपत्र वितरित
जिल्ह्यात सर्वाधिक २० हजार २४७ अर्ज एकट्या गंगापूर तालुक्यात मंजूर झाले आहेत. त्यापाठोपाठ कन्नडमध्ये ८ हजार ७८८, वैजापूरमध्ये ४ हजार ८३१ आणि सिल्लोडमध्ये २ हजार ९५० अर्ज मंजूर झाले आहेत.
हैदराबाद गॅझेटनुसार १६० प्रमाणपत्र
२ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन प्राप्त १८० अर्जापैकी १६० जणांना प्रमाणपत्र वितरित केले. तर १८ अर्ज नामंजूर आणि २ प्रलंबित आहेत.
३० लाख दस्तांची तपासणी
कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्ह्यातील ५३२ गावांमध्ये तब्बल ३० लाख ८ हजार ५६२ दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. जुन्या, निजामकालीन, उर्दू तसेच मोडी लिपीतील अभिलेखांचाही यात समावेश आहे. तपासणीत विविध विभागांमध्ये एकूण ५ हजार २ नोंदी आढळल्या असून, त्यांचे स्कॅनिंग करून जतन करण्यात आले आहे.
११४२ वैधता प्रमाणपत्र वितरित
जातवैधता प्रमाणपत्रासाठी १ हजार ३५३ जणांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार १४२ जणांना वैधता प्रमाणपत्र दिले. तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १७९ प्रकरणे प्रलंबित आहेत-