

18 gates of Jayakwadi Dam in Paithan opened by half a foot
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गेल्या आठवड्यापासून वरील धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक जमा झाली. धरण ९१ टक्के भरले. गुरुवारी (दि.३१) राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आ. विलासबापू भुमरे, आ. हिकमत उढाण, आ. रमेश बोरणारे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या हस्ते धरणाच्या दरवाजाचे पूजन करून २७ पैकी १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फुटाने खुले करण्यात आले. गोदावरी नदीत प्रथम ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तत्पूर्वी गोदावरीची आरती करून खणा-नारळाने धरणातील पाण्याचे पूजन करण्यात आले. जायकवाडी धरणाच्या वरील भागातून पाण्याची आवक लक्षात घेऊन गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले की, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याचे नियोजन राज्य शासनाने सुरू केले आहे.
भविष्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व औद्योगिकनगरीला पाणीटंचाईला समोर जावे लागणार नाही. येथील नाथसागर धरणाच्या कालव्याचा सर्व्हे करून पिकासाठी अधिक स्वरूपाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कालवा दुरुस्तीसाठी शासनस्तरावर निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही मंत्री विखे यांनी याप्रसंगी सांगितले.
या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता सुनंदा जगताप, राजू मुंदडा, भारत शिंगाडे, पल्लवी जगताप, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, दीपक डोंगरे, प्रशांत नखाते, लांजेकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खरडकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर कारखानादारांकडे थकीत असलेले उसाचे पेमेंट तात्काळ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल पूजन कार्यक्रमाप्रसंगी अचानक उसाचे पेमेंट मिळत कसे नाही, असे म्हणत घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ या कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी घोषणाबाजी करीत असल्याचे निदर्शनास येतात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलासबापू भुमरे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलन करणारे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घोषणाबाजी थांबवण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट तात्काळ देण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आमदार विलासबापू भुमरे यांनी सांगितले. आंदोलन करणारे पदाधिकारी प्रमुख ज्ञानदेव मुळे, चंद्रकांत झारगड यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या आश्वासनानंतर काहीसे शांत झाले. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना आपल्या मागणीची निवेदन सादर केले.