

17,000 candidates took the exam on the first day of the municipal corporation recruitment drive
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील विविध २२२ पदांच्या भरतीसाठी दोनदिवसीय ऑनलाईन परीक्षेला बुधवारी (दि.८) सुरुवात झाली. राज्यातील १८ शहरांमधील ३१ परीक्षा केंद्रांवर झालेल्या पहिल्या दिवसाच्या परीक्षेसाठी नोंदणीकृत २३ हजार ५४६ उमेदवारांपैकी १७ हजार ११९ जणांनी परीक्षा दिली, तर ६ हजार ४२७ उमेदवार अनुपस्थित राहिले. त्यामुळे पहिल्या दिवसाची एकूण उपस्थिती ७२.७० टक्के इतकी नोंदविण्यात आली. परीक्षा संपूर्णपणे सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
आयबीपीएस संस्थेमार्फत महापालिकेतील विविध संवर्गातील २२२ पदांसाठी ८ आणि १ जुलै रोजी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील व कल्पना पिंपळे यांच्या नेतृत्वात आस्थापना विभागाचे उपायुक्त अभय प्रामाणिक, सहायक आयुक्त श्रीकांत वैद्य यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी सुमारे २९ हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. पहिल्या दिवशी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. २०० गुणांच्या या परीक्षेसाठी उमेदवारांना दोन तासांचा कालावधी देण्यात आला होता. प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्नांचा समावेश असून, प्रत्येक प्रश्नाला दोन गुण निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची ओळख पडताळणी, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक यंत्रणा काटेकोरपणे राबविण्यात आली. महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त्ती करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार अथवा तांत्रिक अडथळा निर्माण झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच भरती परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी, आज गुरुवारी (दि.९) दोन सत्रांमध्ये सुमारे साडेपाच हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत.
पावसामुळे सकाळच्या सत्रात धावपळ
चिकलठाणा एमआयडीसी येथील आयऑन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रासाठी येणाऱ्या उमेदवारांना रिमझिम पावसाचा सामना करावा लागला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही काळ उमेदवारांची धावपळ उडाली. मात्र त्यानंतर हवामानात सुधारणा झाल्याने दुपारच्या दोन्ही सत्रांवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही.