

16-year-old girl molested by unknown person
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अवघ्या १६ वर्षांच्या अविवाहित मुलीवर अज्ञाताने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. नुकताच तिने घनसावंगी येथे बाळाला जन्म दिला. पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक या प्रकाराबाबत काहीही सांगत नसल्याने अखेर पोलिसांनी फिर्यादी होऊन घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.
घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात १६ वर्षांची मुलगी गर्भवती उपचारासाठी दाखल झाली होती. ही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता पोलिसांना दिली. पोलिस आणि महिला अधिकारी रुग्णालयात पोहोचले.
मात्र मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर पीडिता अंबड येथील एका रुग्णालयात प्रस्तुतिसाठी दाखल झाली होती. बाळंतपणानंतर ती आणि तिचे नातेवाईक कोणतीही माहिती न देता निघून गेले. हे लक्षात येताच अंबड पोलिसांनी त्यांना शोधून काढले.
त्यानंतर घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडित मुलगी आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी जालना येथील स्त्री रुग्णालयात हलवले. बालकल्याण समिती, जालना यांनाही माहिती देण्यात आली. समिती सदस्यांनीही मुलीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीही बोलत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करत आहेत.