

छत्रपती संभाजीनगर : दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने परीक्षा केंद्रांची निश्चिती केली आहे. गैरप्रकाराच्या घटनांमुळे यंदा दहावीची १०, तर बारावीची २७ परीक्षा केंद्र बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तर गैरप्रकार घडलेली १७ परीक्षा केंद्र मात्र यंदाही कायम ठेवण्यात आली आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयस्तरावर परीक्षेची तयारी सुरू आहे. यंदा केंद्र निश्चितीबाबतची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत रेंगाळली. केंद्र निश्चिती नसल्याने नियोजन प्रक्रियाही रखडली होती. अखेर केंद्र निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गैरप्रकार आढळलेल्या परीक्षा केंद्रांपैकी अनेक केंद्र बंद करण्यात आले आहेत. तर काही केंद्रांना अभय मिळाले आहे.
गैरप्रकार आढळलेल्या परीक्षा केंद्रांपैकी अनेक केंद्र बंद करण्यात आले आहेत. तर काही केंद्रांना अभय मिळाले आहे. कॉपीमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने कॉपी आढळलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यात इयत्ता दहावीचे ६४४ केंद्र होते. तर बारावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ४६० इतकी होती. परीक्षेदरम्यान ५४ केंद्रांवर गैरप्रकार प्रकरणी कारवाया करण्यात आल्या. त्यापैकी ३७ केंद्र बंद करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तर कमी विद्यार्थी संख्या असलेली ७६ पैकी दहा केंद्र बंद करण्यात आली. उर्वरित केंद्र पर्यायी व्यवस्था न झाल्याच्या कारणाने बंद करता आली नाहीत, असे मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.
बाहेरचा स्टाफ असणार
शासनाच्या नव्या धोरणामुळे गैरप्रकाराची असंख्य केंद्र रद्द करावी लागणार आहेत. परंतु तिथे पर्यायी सोय होण्यात अडचणी येत असल्याने त्यावर सध्या पुनर्विचार करण्यात येत आहे. काही ठिकाणी आधीची परीक्षा केंद्र कायम ठेवून तिथे खबरदारी म्हणून बाहेरच्या शाळेवर कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.