नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात ऑगस्ट महिना संपायला आला तरी अद्यापही एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यातच पेरणी केलेल्या मका पिकाच्या अक्षरशः वाती झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाअभावी चाऱ्याची वाढच झाली नसल्याने जनावरांसाठी मुबलक चारा नाही. तर उत्पन्न सुद्धा मिळणार नाही, याचा शेतकऱ्यांना फटका मोठा बसणार आहे.
रिमझिम पावसावर तग धरलेल्या खरीप पिकांवर शेतकरी थोडाफार आनंदी असला तरी पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे कपाशी, मका, तूर, सोयाबीन या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दुष्काळाची झळ तालुक्यात तीव्र होणार आहे.
तर दुसरीकडे कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती देखील गंभीर झाली असून पावसाच्या भरोवशावर असलेली आगामी पिकांची लागवड देखील धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतीचे गणित निसर्गावर अवलंबून असते. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मशागत, बी बियाणे, खते यावर शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. पाऊस न झाल्यास मका, सोयाबीन ही पिके हातची जाण्याची भीती आहे.
हेही वाचा