

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (शुक्रवार) सकाळी राष्ट्रावादी पक्षात फूट पडलेली नाही, पक्षात फूट केव्हा पडते, जेव्हा एक मोठा गट बाहेर पडतो. तेव्हा अजित पवार हे आमचेच नेते आहेत. फक्त एक गट पक्ष सोडून गेला म्हणजे फूट पडली असे होत नाही असे मत व्यक्त केले. त्यावरून आज कृषी मंत्री धनंजय मुंढे म्हणाले की, मी यावर बोलण उचित नाही. आम्ही आमच्या देवाला इतकंच म्हणत होतो की, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या आणि आमच्या देवाने आमचं ऐकले, आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आहेत.
देवाने आशीर्वाद दिला म्हणजे देव आपल्या आजूबाजूलाच असतो. आमची प्रार्थना भगवंतांनी ऐकली आहे. पक्षात बहुसंख्य लोकांची इच्छा हीच होती. आमच्या देवाने आमचे ऐकले. बीडची सभा ही कुणालाही उत्तर सभा नाही, बीडच्या विविध प्रश्नावर सभा आहे. मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता आहे. सहा जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. यासाठी सरकार गंभीर असल्यामुळे आम्ही आढावा बैठक घेत आहे. अनेक मंत्री या बैठकीत असतील.
नाफेड खरेदीत नव्या अटी नाही
कांदा खरेदी सुरू आहे. कांदा दोन हजार ४१० रुपयांनी खरेदी करणार आहे. ज्या अटी पूर्वी होत्या त्याच अटी आहे. कांद्याची खरेदी सुरू आहे, पण म्हणावी तशी कांद्याची आवक नाही. अनेकांचे म्हणणे आहे की, नाफेडने बाजारात येऊन कांदा खरेदी करावी. कांदा खरेदीसाठी नव्या अटी नाही. केंद्रीय पणन मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोललो आहे. त्याबाबत संध्याकाळपर्यंत उत्तर येईल अशी आशा आहे.