बीड : केज पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या

बीड : केज पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या
Published on
Updated on

केज; पुढारी वृत्तसेवा : केज शहर आणि परिसरातून मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत होत्या. परंतु पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते. मात्र, एका घटनेत मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

बीड येथील मेहबूबखान अमितखान पठान हे त्यांची पॅशन प्रो मोटार सायकल क्र. (एम एच-२३/बी-१३३६) वरून बीडकडे जात हेते. ते केज येथील बस स्टँडवर अनिल भोजनालय येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची मोटार सायकल अनिल भोजनालयासमोर पार्क केली, त्यानंतर ते जेवण्यासाठी हॉटेलात गेले. जेवण संपल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांची मोटार सायकल तेथे नसल्याचे आढळले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु, मोटार सायकल आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकार मित्राशी संपर्क साधला आणि तक्रार देण्यासाठी ते पोलीस स्टेशनकडे निघाले.

मेहबूबखान पठाण हे बस स्टँडपासून पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी जात असताना, त्यांना वाटेत तीन इसमांनी गाठून मोटार सायकल आम्ही शोधून देतो, त्यासाठी ५ हजार रु. द्या. अन्यथा तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देत पैशाची मागणी केली. सदर तीन इसम हे मेहबूबखान पठाण यांना पोलीस स्टेशनसमोर धमक्या देऊन पैशाची मागणी करीत चोरीची तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते.

दरम्यान, त्यांच्या पत्रकार मित्राने ही माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना दिली. यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देत तात्काळ कारवाई करून चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस अधिकारी चोरट्यांच्या सर्व हालचालीवर नजर ठेवून होते. मात्र, चोरट्यांना पोलिसांचा संशय येताच, ते पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाठलाग करून झडप घालत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवितात त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल ताब्यात घेतली. चोरीला गेलेली मोटार सायकल केज पोलिसांनी अवघ्या दीड तासात ताब्यात घेत चोरांना जेरबंद केले आहे. या प्रकरणी मेहबूबखान पठाण यांच्या तक्रारी वरून, आरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला आणि पाप्या उर्फ जुबेर मुस्ताक फारोकी (सर्व रा. केज) यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५०६/२०२२ भा. दं. वि. ३७९, ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news