

Dhangar reservation issue youth death
गेवराई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका तरुणाने आपले आयुष्य संपवले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मृत तरुणाचे नाव ज्ञानदेव नामदेव कोल्हे (वय ४५, रा. संतोष नगर, मोंढा नाका, गेवराई) असे असून ते गेवराई शहरात पिठाची गिरणी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचा संघर्ष सुरू असून दीपक बोराडे हे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोळा दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. मात्र सरकारकडून या आंदोलनाची कोणतीही गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे कोल्हे हे मानसिक तणावाखाली होते.
सोमवारी (दि. ६) मध्यरात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना कोल्हे यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, “मी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे. माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका.”
या घटनेनंतर नातेवाईक व धनगर समाजातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत गेवराई तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून ठिय्या दिला. यावेळी “धनगर समाजाला न्याय द्या, आरक्षण द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने गेवराई तहसीलदारांना निवेदन देत राज्य सरकारकडून मृताच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व शासकीय सन्मानाने अंत्यसंस्काराची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून शासनाने तातडीने आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे.