

Ashti Hotel Worker Death
आष्टी : तालुक्यातील सांगवी (पाटण) शिवारात एका २० वर्षीय तरुणाने नदीकाठच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. भाऊसाहेब ऊर्फ बावड्या राम खंडागळे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे नेमकी घटना ?
भाऊसाहेब हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून गावाजवळच एका हॉटेलवर कामगार म्हणून काम करत होता. त्याचे वडील भोळसर असल्याने चुलते त्यांना ऊसतोडीला सोबत नेतात, तर आई कधी पुण्यात तर कधी गावी असते. भाऊसाहेब स्वतः चुलत्याच्या घरी राहून कुटुंबाला आधार देत होता. शुक्रवारी तो गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता.
मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला असता, घरापासून जवळच असलेल्या नदीकाठच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.