

Wedding trends are changing; financial burden on bride's family is increasing
गजानन चौकटे
गेवराई : तुळशी विवाहानंतर पारंपरिक लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र या मोसमात एक वे-गळीच झळाळी दिसत असून लग्नाचा ट्रेंड झपाट्याने बदलतोय. एकेकाळी नातेसंबंध जुळ-वणारा आणि साधेपणात साजरा होणारा विवाहसोहळा आता भव्य सजावट, डेस्टिनेशन वेडिंग, थीम डेकोरेशन आणि सोशल मीडियावर दाखवण्यासाठी साकारला जाणारा इव्हेंट बनला आहे.
पूर्वी गावात किंवा घराच्या अंगणात नातेवाईकांच्या मदतीने साध्या पद्धतीने लग्न पार पडे, पण आता लग्न म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी तयार केलेला सविस्तर कार्यक्रम. हॉल, फोटोग्राफी, लाईव्ह म्युझिक, खास मेनू, स्पेशल लाइटिंग आणि सेलिब्रिटी सजावट यामुळे विवाह एक प्रकारे प्रदर्शनाचा भाग बनला आहे.
या बदलत्या पद्धतीमुळे सर्वाधिक फटका वधूपक्षाला बसतोय. साडी, दागिने, केटरिंग, सजावट, नातेवाईकांसाठी भेटवस्तू, फोटोग्राफी आदी बाबतीत खर्च प्रचंड वाढला आहे. पूर्वी काही लाखांत होणारा विवाह आता दहा ते वीस लाखांपर्यंत पोहोचतो. काही ठिकाणी तर 'मुलगी आहे म्हणून खर्च करावा लागतो' अशी मानसिकता कायम असल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना लग्नासाठी कर्ज घ्यावे लागते. यामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण वाढतोय.
पूर्वी लग्नाची जबाबदारी नातेवाईक, मित्रमंडळी मिळून पार पाडायचे. आता सर्व काही इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या हाती दिले जाते. त्यांचा खर्च ठराविक असतोच आणि त्यात भर पडते ती दाखवण्याच्या स्पर्धेची. लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत, कार्यक्रम भव्य दिसावा, यासाठी दोन्ही पक्षांकडूनच अनाठायी खर्च केला जातो. परिणामी, विवाहाचा मूळ हेतू दोन कुटुंबांचा मिलाफ आणि संस्कार जपणे मागे पडतोय.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, आजची तरुण पिढी 'दाखवण्यासाठीचं लग्न' करत आहे. फॅशन आणि फोटोच्या नादात भावना हरवतात, नात्यांचा ऊब कमी झाली आहे. डिजिटल निमंत्रणे, मर्यादित पाहुणे आणि अत्याधुनिक सादरीकरणामुळे परंपरागत लग्नांचा आत्माच हरवतोय. जुन्या पिढीतील अनेक जण म्हणतात, "लग्नाचे वैभव दाखवण्यात अर्थ नाही, नात्यांचा आदर आणि साधेपणा टिकवला पाहिजे."
आज पुन्हा एकदा समाजात "साधेपणातच सौंदर्य आहे" हा विचार रुजवण्याची गरज आहे. कारण लग्न हे आयुष्याचा प्रारंभ आहे, स्पर्धेचा नाही.