Walmik Karad | वाल्मिक कराड विरोधात अखेर मोक्का अंतर्गत कारवाई

Santosh Deshmukh Murder case : हत्येचा कट रचल्याचा एसआयटीकडून आरोप
Walmik Karad
वाल्मिक कराड विरोधात अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder case) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज (मंगळवारी) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच कराड विरोधात अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोपदेखील एसआयटी (SIT) कडून ठेवण्यात आला आहे. वाल्मिक याच्यावर मोक्का लावण्यात आल्यानंतर सीआयडी पोलीस आता त्याची पुन्हा कोठडी मागणार आहेत.

केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच ८ आरोपींना याआधीच मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. आता कराड विरोधातही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत.

खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी कराडला आज केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी निगडित असलेले आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणी कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली.

Walmik Karad : कराड समर्थक आक्रमक

दरम्यान, खंडणी प्रकरणी संशयित आरोपी असलेल्‍या वाल्मिक कराडच्या आईने सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थनार्थ कराड समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. माझ्या मुलावर अन्याय होत असून न्याय द्या, अशी मागणी करत कराड याच्या आईने परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेले आहेत. तरी यातील मुख्य गुन्हेगार म्हणून चर्चेत असलेला मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याचबरोबर त्याच्यावर मोक्का अंतर्गतदेखील कारवाई झालेली नाही. त्यालाही या गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी, असे म्हणत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर सोमवारी (दि.१३) चढून आंदोलन केले होते.

Santosh Deshmukh Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास नवीन ‘एसआयटी’कडे

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. जुन्या एसआयटीमध्ये ९ सदस्य होते. नवीन एसआयटीमध्ये सात सदस्य असतील.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात याप्रकरणी नऊ सदस्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. हे सर्व सदस्य बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी होते. या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी हरकत घेतली होती. तसेच, वाल्मिकला वाचवले जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीय आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यातर्फे सातत्याने केला जात होता. यासाठी जुन्या एसआयटीतील आठ सदस्यांना डच्चू देण्यात आला असून त्याठिकाणी सात सदस्यांची नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

Walmik Karad
माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news