Vilas Ghule murder case : विलास घुले प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा सहभाग
Vilas Ghule murder case
Vilas Ghule murder case : विलास घुले प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाfile photo
Published on
Updated on

Vilas Ghule Case: Protest March to the District Collector's Office

बीड, पुढारी वृत्तसेवा: विलास घुले हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने खा. बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर आरोप होत आहेत. सीआयडीने या प्रकरणात सखोल तपास करून आठ दिवसांत कारवाई करावी असा अल्टीमेटम अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी अॅड. सदावर्ते बोलत होते.

Vilas Ghule murder case
Beed News : मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या १० बुलेटधारकांना दंड

केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले यांना न्याय मिळावा, खासदार पुत्राला अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी स्व. घुले यांच्या पत्नी सुषमा घुले, भाऊ रमेश घुले आणि 60 वर्षीय आशाबाई घुले यांचे मागील 18 दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि.21) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागांतून समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्यासपीठावर ओबीसी नेते तथा माजी आमदार नारायणराव मुंडे, आरक्षण अभ्यासक अॅड. गुणरत्न सदावर्ते, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, भगवान सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत सानप, ओबीसी आंदोलक बटूळे बाबा, अॅड. जयश्री पाटील, अॅड. मंगेश ससाणे, धनराज गुट्टे, बळीराम खटके, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, नितीन सोनवणे, नगरसेवक सतीश बडे, अॅड. भाऊसाहेब लटपटे, माऊली सिरसट, मोहन आघाव, अॅड. राहुल आघाव, केशव तांदळे, संजय केदार, मनीषा सानप, मयुरी बांगर यांच्यासह ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

Vilas Ghule murder case
Beed News : तुम्ही चंदशेखर बावनकुळेंना अपमानास्पद बोलाल, तर आम्ही एकनाथ शिंदेंना बोलणार

विविध न्याय मागण्यांचे निवेदन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अॅड. गुणरत्न सदावर्ते व घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यानंतरों ड. जयश्री पाटील व सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते रमेश घुले व त्यांच्या कुटुंबीयांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. या मोर्चात समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, स्व. विलास घुले यांना न्याय द्या, खासदार पुत्राला अटक करा, अशा विविध घोषणाफलकांनी लक्ष वेधून घेतले.

घुले कुटुंबीयांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार : अॅड. गुणरत्न सदावर्ते

मला खासदार किंवा आमदार व्हायचे नाही. कोणालाही टेंडर मिळवून देण्याचे माझे काम नाही. विलास घुले कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या लढ्यात सहभागी झालो आहे. कुटुंबीयांना घेऊन पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर एका तासात तपास सीआयडीकडे देण्यात आला. बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आरक्षण अभ्यासक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. घुले कुटुंबीयांच्या उपोषणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. प्रतिसाद मिळत नसल्याने धुले यांच्या पत्नीने विष प्राशन केले. न्याय देताना दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे हे मंत्र्यांवर टीका करत असताना या प्रकरणावर गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला.

खा. सुप्रिया सुळे बीडमध्ये येऊन आरोपी कोण, हे जाहीर करतात; त्या पोलीस हवालदार आहेत काय? घुले कुटुंबीय वंजारी असल्याने त्या सांत्वनासाठी आल्या नाहीत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे सदावर्ते म्हणाले. यावेळी 'सुप्रियाताई, शेम.. शेम..' अशा घोषणा देण्यात आल्या. मनोज जरांगे कोणासाठी आणि कोणाला उद्देशून बोलतात, हे आता मराठा समाजालाही समजू लागले आहे. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडरबाबत आम्हाला माहिती नाही, असे समजू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. सीडीआर तपासात सौरभ सोनवणे यांचा संबंध आढळल्यास आठ दिवसांत त्यांना अटक करावी, अन्यथा सरकारला परिणामांना सामोरे जावे लागेल.

आम्ही जशास तसे उत्तर देणारे लोक आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. सुषमा घुले या लाडक्या बहिणी नाहीत का, याचे उत्तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे. भटक्या, ओबीसी व मागासवर्गीय समाजातील व्यक्तींवरील अन्याय रोखण्यासाठी सरकारने वेळीच पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली.

बीडच्या एसपींना निलंबित करा : धनराज गुट्टे

घुले प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. केजमध्ये आंदोलन केल्यानंतर केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची बदली करण्यात आली. आता बीडच्या एसपींना निलंबित करून दबावाला बळी न पडणारा आयपीएस अधिकारी बीड जिल्ह्यात पाठवावा, तसेच त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

..तर जनआंदोलन उभे करावे लागेल : सानप

घुले प्रकरणात सीडीआर तपासून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. पोलिसांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नियुक्ती करावी आणि खासदार पुत्राला अटक करावी. दहा दिवसांत न्याय मिळाला नाही, तर मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news