

वडवणी : उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून पावसाने दडी मारल्याने वडवणी तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून सुरू असलेल्या नियोजित भारनियमनासोबतच मध्यरात्री करण्यात येणाऱ्या आपत्कालीन भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना वारंवार पाणी देण्याची गरज निर्माण झाली असून विजेची मागणी वाढली आहे. परिणामी ग्रामीण भागात विविध वेळांमध्ये आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नियोजित भारनियमनाचा सामना सुरू असतानाच मध्यरात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत रात्री एक वाजेपर्यंत आपत्कालीन भारनियमन केले जात असून नियोजित आणि आपत्कालीन भारनियमन मिळून तब्बल दहा तास वीजपुरवठा बंद राहत असल्याची तक्रार आहे. उकाड्याने त्रस्त नागरिकांना त्यामुळे रात्र जागून काढावी लागत आहे.
तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मध्यरात्री अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही दूरध्वनी बंद असल्याने कोणतीही माहिती मिळत नसल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महावितरण प्रशासनाने मध्यरात्रीचे आपत्कालीन भारनियमन तातडीने बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागावर अन्यायकारक पद्धतीने भारनियमन लादले जात आहे. शहर-गाव असा भेद न करता सर्वांना समान वीजपुरवठा मिळाला पाहिजे. याबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार आहोत.
संजय आंधळे, जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, बीड
मुंबई येथून लोड मॅनेजमेंटचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित भागाचा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्यानंतरच वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जातो. यामध्ये स्थानिक कार्यालयाच्या हातात काही नसते.
पद्मनाभ कुलकर्णी, शाखा अभियंता, महावितरण केंद्र, वडवणी