Purushottampuri yatra : पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रश्न ऐरणीवर!

गंगेतील होटग्याचा प्रवास जीवघेणा; चक्रतीर्थावर विनापरवाना होटग्यांची खुलेआम वाहतूक
unsafe boat transport Godavari
Purushottampuri yatra newspudhari photo
Published on
Updated on

पद्माकर देशमुख

किट्टी आडगाव : माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिक मास यात्रेत भाविकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गोदावरी नदीतील चक्रतीर्थ परिसरात बिनपरवाना आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेल्या होटग्यांमधून भाविकांची वाहतूक सुरू असून प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेच्या या यात्रेत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी हे भारतातील अधिक मासाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. भगवान पुरुषोत्तमाचे अधिष्ठान असलेल्या या तीर्थक्षेत्राला दर अधिक मासात राज्यासह परराज्यातूनही लाखो भाविक भेट देतात. यंदाचा अधिक मास 17 मे ते 15 जून या कालावधीत सुरू असून संपूर्ण महिनाभर येथे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि गोदावरी स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

unsafe boat transport Godavari
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या आठ ते दहा होटग्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक भाविकांना बसवून नदी पार केली जात आहे. या होटग्यांना कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले जात असून अनेक होटग्यांमध्ये लाईफ जॅकेट, दोरखंड, बचाव साधने किंवा प्रशिक्षित चालक यांचाही अभाव आहे. विशेष म्हणजे नदीच्या मध्यभागी असलेल्या चक्रतीर्थ परिसरात पाण्याचा प्रवाह खोल आणि धोकादायक मानला जातो.

गोदावरी नदी परिसरात अपेक्षित पोलीस बंदोबस्त नसल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. यात्रेसाठी लाखो भाविक येत असताना नदीकाठावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात नसल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे यात्रेतील दुकाने, वाहनतळ आणि नदीकाठ परिसरातून महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि भाविकांकडून केला जात आहे.

पुरुषोत्तमपुरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील वर्षभरापासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र एवढ्या मोठ्या धार्मिक यात्रेत ग्रामपंचायत कार्यालयाचा एकही कर्मचारी नदी परिसरात उपस्थित नसल्याचे चित्र अनेकांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सध्या अधिक मास यात्रेमुळे दररोज लाखो भाविक पुरुषोत्तमपुरी येथे दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत नदीतील वाहतुकीवर नियंत्रण नसल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेषतः महिला आणि वृद्ध भाविकांची संख्या अधिक असल्याने धोका अधिक वाढला आहे.भाविकांच्या म्हणण्यानुसार, एका होटग्यात किमान वीस ते पंचवीस लोकांना बसवले जाते. काहीवेळा महिलांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. जर नदीच्या मध्यभागी एखादा अपघात झाला तर जीव वाचविण्याची कोणतीही व्यवस्था नाही. भाविक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुढील उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे.

सर्व होटग्यांची तात्काळ तपासणी करून परवानाधारक होटग्यांनाच परवानगी द्यावी प्रत्येक होटग्यात लाईफ जॅकेट सक्तीचे करावे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक थांबवावी नदी परिसरात एनडीआरएफ किंवा आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करावे पोलीस बंदोबस्त वाढवून नियंत्रण कक्ष सुरू करावा ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाने संयुक्त देखरेख ठेवावी चक्रतीर्थ परिसरात सूचना फलक आणि सुरक्षा दोर उभारावेत दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

unsafe boat transport Godavari
Naam Foundation | 'नाम फाऊंडेशन' करणार दहिबांव नदीतील गाळ उपसा

माजलगाव तहसील प्रशासन, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा श्रद्धेच्या यात्रेला निष्काळजीपणाचे ग्रहण लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पूर्वीच्या दुर्घटनांची आठवण

या पूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे हि अशाच प्रकारे पाण्यात लहान जहाज बुडून मायलेकारासह इतर अनेक जण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना अशा विविध धार्मिक स्थळांवर यापूर्वीही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाव आणि होड्या बुडून अनेक भाविकांना जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहेत. नदीतील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, सुरक्षेचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळे मोठ्या दुर्घटना घडल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे पुरुषोत्तमपुरीतील सद्यस्थिती पाहता भविष्यात संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

गंगास्नानासाठी जीव धोक्यात घालून प्रवास

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील चक्रतीर्थ स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. अधिक मासात येथे स्नान केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दररोज हजारो महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह भाविक नदीकाठी दाखल होत आहेत. मात्र ऐल तीरावरून पैल तीरावर जाण्यासाठी उपलब्ध असलेली व्यवस्था अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news