

Umakiran case: SIT lodged in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा: उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बीडमध्ये तळ ठोकत चौकशीला गती दिली आहे. आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यीय पथक हे प्रकरण बारकाईने तपासत असून, या पथकात एकाही स्थानिक पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याचा यात समावेश नाही, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे.
तपासापासून बीड पोलिसांना जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. कारण आरोपीला फरार करण्यास स्थानिक आमदार यांचा हात असल्याचा आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय दबाव न येता याचा निष्पक्षपती तपास व्हावा.
उमाकिरण कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप वर्ग चालवणारे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्यावर आहे. या दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आले असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या आरोपानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एसआयटीची घोषणा केली होती. त्यानंतर दहा-बारा दिवसांत पथक स्थापन करण्यात आले आणि आता बीडमध्ये तपास सुरू झाला आहे.
एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार असून, अत्याचार झाल्याच्या तक्रारीचा ठोस पाठपुरावा केला जाणार आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का, याचा स्पष्ट खुलासा या तपासातून होणार आहे.
एसआयटीच्या कार्यवाहीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणांत सरकारने थेट एसआयटीमार्फत हस्तक्षेप केल्याने भविष्यातील घटनांना आळा बसू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.