

शिरूर : सप्टेंबर 2025 या महिन्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध नुकसानीसह शासकीय मालमत्तेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज शिरूर कासार तालुक्यातील काही भेटी देऊन झालेल्या विविध नुकसानीची पाहणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची झालेली पीक नुकसान, रस्ते, वाहून गेलेले पूल,तलाव फुटणे, विद्युत वितरणाची पडझड आदी करून पाहणी करण्यात आली आहे.
शिरूर कासार तालुक्यामध्ये 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 934.9 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तो 181 टक्के इतका आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात एकूण सात वेळेस अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. तथापि या आपत्तीमध्ये सुदैवाने तालुक्यात एकही व्यक्ती मयत झालेली नाही. मात्र मयत झालेल्या पशुधनापैकी 16 प्रकरणांमध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाले होते, त्यानुसार मदतीची कार्यवाही झाली असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याच अनुषंगाने केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या आहेत. या अंतर्गत शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली व शिरूर कासार तालुक्यातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला. या केंद्रीय पथकामध्ये सहसचिव आर के पांडे व इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस व्ही शर्मा व त्यांचे सहकारी यांच्यासोबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल साळवे, बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव, पाटोद्याच्या उपविभागीय वसीमा शेख, शिरूर कासारचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी बागलाने, तालुका कृषीअधिकारी नागरगोजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गौरव मोरे, विद्युत वितरणचे सानप, मंडळ अधिकारी शहादेव सानप तलाठी शारदा राठोड यांच्यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील- तहसीलदार घोळवे
तालुक्यातील 400 घरात पाणी शिरले होते, त्यानुसार प्रति कुटुंब दहा हजार रुपये मदत व दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू या धान्याचे वितरण करण्यात आलेले आहे. तालुक्यात एकूण 748 घरांची पडझड झाली असून अंशतः पडझड व पूर्णता पडझड या बाबी विचारात घेऊन मदत देण्यात आली असून काही प्रकरणात मदतीची कार्यवाही सुरू आहे.
महापुरामुळे एकूण 703 विहिरीचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे गटविकास अधिकारी यांना माहिती पुरविण्यात आली आहे. तालुक्यात एकूण 2876 शेतकऱ्यांचे 634 हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे, त्यामध्ये मदतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
महत्त्वाचा भाग म्हणजे एकूण 49500 शेतकऱ्यांचे विविध प्रकारच्या पिकांचे एकूण नुकसान 41998.60 हेक्टर इतके झाले होते. त्यांना दिवाळीपासून अनुदान वितरण सुरू आहे. आतापर्यंत 46,644 शेतकऱ्यांचे अनुदान वाटप झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच ज्यांचे आधार क्रमांक मधील नाव व फार्मर आयडी मधील नाव यामध्ये तफावत आहे, त्यावर देखील कार्यवाही सुरू आहे..
केंद्रीय पथकाने या सर्व बाबींची माहिती घेऊन, तसेच वेगवेगळ्या गावात झालेल्या नुकसानीचे फोटो व अहवाल पाहून स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच दौऱ्याच्या वेळी संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, गावातील शेतकरी यांच्या कडून प्रतिक्रिया व काही अडीअडचणी जाणून घेतल्या, त्या अनुषंगाने गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी यांनी काय काम केले त्याचा आढावा घेतला असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली आहे.