

Traffic jam at Dharur Ghat while removing an accident-affected vehicle
धारूर, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे धारूर येथे तहसील कार्यालयाकडून आयोजित जनता दरबारासाठी येत असताना धारूर घाटात अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे काम सुरू होते.
यामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत अडकलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाहून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, वाहनचालक व प्रवाशांनी घाटातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्त केली. घाटातील अपघातांची वाढती संख्या, अपुरी रस्त्याची रुंदी, संरक्षण भिंतींचा अभाव आणि धोकादायक वळणे याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांत या घाटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भातील बातम्यांची कात्रणे आणि निवेदनही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना घटनास्थळी देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घाटातील समस्या गंभीर असून त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. लवकरच आवश्यक उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी, महिला व लहान मुले घाटात अडकून पडली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह धारूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली.