

Tipper transporting sand hits Eicher
कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला भरधाव धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान बीड अहिल्यानगर राज्य महामार्गावरील सांगवी शिवारात घडली.
अहिल्यानगर येथून पीव्हीसी पाईप घेऊन एक टेम्पो शुक्रवारी सकाळी बीडकडे रवाना झाला. तर याचवेळी डोईठाणवरून धामणगावकडे अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर भरधाव वेगात जात होता. सकाळी ६:३० दरम्यान बीड अहिल्यानगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील सांगवी परिसरात भरधाव वेगाने टायर फुटल्याने टिप्पर अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोवर धडकला.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी कडा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार भाऊसाहेब आहेर, अमोल नवले, वाहन चालक प्रताप घोडके यांनी भेट दिली असून पंचनामा केला आहे. सकाळी साडेसहाच्या दरम्यान दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघात होऊन सहा तास उलटून देखील वाहने रस्त्यावरच उभा होती.
आष्टी तहसील अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पद्धतीने वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे. अनेकदा तक्रारी करून देखील अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरत आहे. भरधाव वेगात जाणारे हे विना नंबरचे डंपर एखाद्याचा जिव घेतल्यानंतरच महसूल प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे