

The police van carrying the Kute couple collided with a motorcycle; a young man died
नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : नेकनूर-येळंब रोडवर (दि.१७) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अमोल हांडगे (वय ३५, रा. वाघेबाभळगाव, ता. केज) यांचा उपचारादरम्यान (दि.१८) सकाळी मृत्यु झाल्याचीघटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीडकडे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनने दुचाकीला समोरासमोर धडक देत निष्पाप तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पोलीस व्हॅनने सायंकाळी मोटरसायकलला जोराची धडक दिली होती. या अपघातात अमोल हांडगे व त्यांच्यासोबत असलेले विक्रम हांडगे (वय ३५) हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघेही शेती व्यवसाय करत असून नेकनूर येथे काम आटपून आपल्या गावी वाघेबाभूळगावकडे परत जात असताना ही दुर्घटना घडली होती. अपघातात अमोल हांडगे यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या.
त्यांचा पाय तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या अपघातात जखमी झालेले विक्रम हांडगे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अर्चना कुटे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोपी सुरेश कुटे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही. या भीषण अपघाताचा सी सी टीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एका निष्याप शेतकऱ्याचा बळी गेल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.