

The idol from the Jain temple in Kesapuri has been stolen.
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरीच्या पवित्र जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घुसखोरी करत पितळी मुर्त्या लंपास केल्या असून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शनिवारच्या मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटीवर हात साफ करण्याचा प्रयत्न केला. दानपेटीचे नुकसान झाले असले तरी आर्थिक हानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान सदरील चोरट्यांनी मंदिरातील प्राचीन पितळी मुर्त्या लंपास केल्याचे समजते. सकाळी मंदिर उघडताना सेवेकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे केसापुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याची तीव्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दे-वळेही सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं काय? असा संतप्त सवाल करत मंदिर परिसरात तातडीने सुरक्षा वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.