

The ideal farm of the Sarpanch of Salegaon, who looks after the village administration
केज, पुढारी वृत्तसेवा: राजकारण आणि शेती ही दोन क्षेत्रे दिसायला भिन्न असली तरी साळेगाव (ता. केज) येथील सरपंच कैलास जाधव यांनी दोन्ही क्षेत्रात संतुलन साधत एक आदर्श घालून दिला आहे. सलग दोन टर्म सरपंचपद सांभाळताना त्यांनी केवळ गावाचा विकासच केला नाही, तर आपल्या वडिलोपार्जित शेतीतही नवनवीन प्रयोग करून एकरी तब्बल १५ टन आद्रक उत्त्पादन घेतले. परिणामी त्यांना दोन एकर शेतीतून तब्बल १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गावचा कारभार, विकासकामे, बैठकांची गर्दी आणि प्रशासनाशी सातत्याने संवाद यामध्येही त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट, वेळेचे नियोजन करून स्वतः, पत्नी आणि सालगडी यांच्या मदतीने त्यांनी आद्रक लागवडीवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले. कैलास जाधव यांनी सांगितले की, शेतीला प्रयोगशीलतेची जोड दिली तर नफा मिळतोच पण समाधानही मिळते. त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक तसेच अनुभवी शेतकरी राजकुमार गित्ते यांचा मार्गदर्शन घेत, शास्त्रशुद्ध पद्धतीने आद्रक लागवड केली. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांना प्राधान्य दिले.
पिकाला पाणी देताना 'जसे आवश्यक तसेच' या तत्त्वावर काम केले. वेळेवर फवारणी, अंतर मशागत आणि मातीतील आर्द्रता संतुलित ठेवत त्यांनी पिकाची निगा राखली. त्यांच्या या मेहनतीचा परिणाम म्हणजे तब्बल ३० टनांचे आद्रक उत्पादन आणि त्यातून झालेले १२ लाख रुपयांचे उत्पन्न. सन २०२१ मध्ये सरपंच जाधव यांनी एकरी चार टन बटाट्याचे उत्पादन घेऊन खळबळ उडवली होती.
त्यांच्या शेतातील एका बटाट्याचे वजन तब्बल ६०० ग्रॅम म्हणजे अर्ध्या किलोपेक्षा जास्त निघाले होते! आज अनेक जण राजकारण, व्यवसाय, नोकरी या कारणांमुळे शेतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र जाधव यांनी दाखवून दिले की, वेळेचे नियोजन, शास्त्रशुद्ध पद्धत आणि न थकणारी जिद्द असेल तर शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर समृद्धीचा मार्ग आहे.