

The house is approved in the name of one person Money to someone else's account
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यात पीएम आवास योजनेतील घरकुल अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. मैंदवाडी येथील सयाबाई रघुनाथ मैद यांना घरकुल मंजूर झाले होते. मात्र काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा बालासाहेब मैद यांनी पंचायत समितीत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले की घरकुलाचे दोन हप्ते जमा झाले आहेत.
बालासाहेब मैंद यांच्या कुटुंबाने एकही हप्ता स्वीकारला नव्हता. त्यांनी आधारकार्ड व बँक पासबुक दाखविले असता, पैसे इतरांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात गंभीर घोटाळ्याचा संशय निर्माण झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बालासाहेब मैद यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना निवेदन देऊन घरकुलाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मंजूर घरकुलाचा प्रत्यक्ष लाभ त्यांच्या कुटुंबास द्यावा, अशी मागणी केली आहे.
धारूर तालुक्यात घरकुलासंदर्भातील अनेक तक्रारी होत असून नागरिकांची पिळवणूक होत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ समिती नेमून संपूर्ण तालुक्यातील घरकुल प्रकरणांची चौकशी करून संबंधित जबाबदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.