

The failure of the Swachh Bharat Abhiyan in Ashti Panchayat Samiti!
कडा, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता स्पर्धा आयोजित करून उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना व शहरांना पारितोषिके मिळवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. परंतु ज्या ठिकाणाहून ही योजना राबवली जाते, त्याच पंचायत समितीत स्वच्छतेबाबत उदासिनता दिसते. भिंतीवर गुटखा, सुपारीच्या पिचकाऱ्यांची रांगोळी काढली गेलेली असल्याने या ठिकाणी कथी राबवणार स्वच्छता मोहीम? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री स्वच्छता अभियान ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची मोहीम आहे. जी राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवली जाते. या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जनतेत स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत, शासनचा एकीकडे स्वच्छ भारत अभियानच्या गाजावाजा तर दुसरीकडे आष्टी पंचायत समितीच्या कार्यालयात आणि परिसरात स्वच्छतेची दयनीय अवस्था असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भिंतींवर सुपारीच्या पिचकाऱ्यांचे डाग, आवारात कचऱ्याचे ढीग, मोकळ्या बाटल्या, आणि निष्क्रिय स्वच्छता कर्मचारी अशी परिस्थिती असताना स्वच्छतेचा आदर्श दाखवण्याच्या घोषणा केवळ कागदावरच दिसतात. पं. समितीच्या आवारातच स्वच्छतेचा अभाव असल्याने गावपातळीवरील कामकाजाची कल्पना सहज येते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कुणी दखल घेत नाही.
अधिकारी, कर्मचारी दररोज या अस्वच्छ भिंतीच्या बाजूने फिरतात, पण कुणालाही जबाबदारीची जाणीव नाही. शासन लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत मिशन राबवते, पुरस्कार वितरण होते, फलक लावले जातात पण अंमलबजावणी मात्र पूर्ण शून्य आणि ढिसाळपणा दिसून येतो. स्वच्छ भारत नव्हे, तर अस्वच्छ कार्यालय अशी वास्तवता दिसत आहे.
दिव्याखाली अंधार...
मुख्यमंत्री स्वच्छता अभियान राबविणारे स्वतःच गुटखा तंबाखू खातात आणि त्याच्याच पिचकाऱ्या कार्यालयाच्या भिंतींवर टाकतात. स्वच्छतेचा संदेश देणारेच अस्वच्छ बर्तन करतात, मग जनतेने काय शिकायचं? अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि स्वच्छता विभाग जबाबदार ठरवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.