

Teacher tortured and cheated out of one crore rupees
बीड, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर गेल्या सोळा वर्षांपासून अत्याचार करत तिची १ कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २००६ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शिंदे यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून फ्लॅटसाठी व इतर कामासाठी पैसे घेऊन अन्यायाने विश्वासघात केला व जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनुसार नारायण शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोनि किशोर पवार करीत आहेत.
हे प्रकरण आपण एकत्र बसून मिटवू, असा फोन वाल्मीक कराड याने केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच यासंदर्भात नारायण शिंदे, वाल्मीक कराड व इतरांच्या उपस्थितीत परळीत बैठकही झाली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.