

टाकरवन : माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्रातील महत्त्वाचे वायरिंग जळून खाक झाल्याने परिसरातील वीजपुरवठा तब्बल 18 तासांहून अधिक काळापासून खंडित झाला आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी सायंकाळी अचानक 33 केव्ही विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकरणातील वायरिंगने पेट घेतला. आगीत उपकेंद्रातील मुख्य वायरिंग सह कंट्रोल रूममधील वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे संपूर्ण वीजपुरवठाच बंद पडला आहे.घटनेनंतर तब्बल 18 तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण प्रशासनाला यश आले नाही.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना उकाड्यात मोठा त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठा, शेती आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी आरोप केला की, टाकरवन येथील 33 केव्ही केंद्रात ना कायमस्वरूपी लाईनमन उपलब्ध असतो, ना अभियंता. त्यामुळे येथे पूर्णपणे रामभरोसे कारभार सुरू आहे.
दुरुस्तीसाठी अंबाजोगाई येथून अधिकारी पाठविल्याचे सांगण्यात आले, मात्र दिवसभरात संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचलाच नसल्याचे समोर आले आहे. उपकेंद्रातील संपूर्ण वायरिंग जळाल्याने वीजपुरवठा बंद पडला आहे.
वायरिंग जळण्याचा प्रकार संशयास्पद : तौर
टाकरवनचे सरपंच सुनील तौर यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत वायरिंग जळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.