

बीड : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात दुधाच्या प्रश्नावर सुरू झालेल्या सत्ताधारी आणि विरोधकांतील आरोप-प्रत्यारोपांना आता अधिक धार आली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार करत जाहीर इशारा दिला. "माझ्या नादी लागू नका. मी डिवचायचा माणूस नाही. मी उलटा फिरलो तर तुम्हालाही नीट सोडणार नाही," अशा शब्दांत धस यांनी प्रतिउत्तर दिले.
बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ गडावर माध्यमांशी संवाद साधताना धस यांनी अधिवेशनातील घडामोडींवर भाष्य केले. दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. "दादागिरी आणि नौटंकी दुसरीकडे चालेल, आमच्याकडे नाही. इतर लोक गप्प बसत असतील; आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन डिवचण्याचा प्रयत्न करता, तर आम्हीही तुमच्याकडे येऊन प्रश्न विचारू," असे धस म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील निर्णयावरही निशाणा साधला. "महाविकास आघाडीच्या काळात जलसंपदा खात्याचे मंत्री कोण होते? त्यांच्या कार्यकाळात जिओ टॅगिंगचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आणि त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट झाली," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
याचबरोबर 'महालक्ष्मी' नावाच्या संस्थेचाही उल्लेख करत धस यांनी पुढील अधिवेशनात या संस्थेबाबत अनेक खुलासे करण्याचा दावा केला. "ही संस्था नेमकी कोणाची आहे, तिची नोंदणी कुणाच्या नावावर आहे, त्यात कोणाचा किती हिस्सा आहे आणि संचालक कोण आहेत, हे सर्व पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समोर आणू," असे त्यांनी म्हटले.
धस यांच्या या वक्तव्यामुळे पावसाळी अधिवेशनात सुरू झालेला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर सुरू असलेली शाब्दिक चकमक आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याचे चित्र असून, आगामी अधिवेशनात या विषयांवर पुन्हा जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'कथित' वक्तव्यावरून धस आक्रमक; जयंत पाटलांना थेट इशारा
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पत्नीविषयी करण्यात आल्याचा दावा असलेल्या 'कथित' वक्तव्यामुळे आपण व्यथित झालो, असे सूचित करत आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. वैयक्तिक पातळीवर बिनपुराव्याचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास आम्हीही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
"माझ्या नादी लागू नका. मी डिवचायचा माणूस नाही. तुम्ही वैयक्तिक पातळीवर आरोप कराल, तर आम्हालाही अनेक बाबी जनतेसमोर मांडाव्या लागतील," अशा शब्दांत धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय संघर्षाचा सूर केवळ धोरणात्मक मुद्द्यांपुरता न राहता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत असून, या प्रकरणावर संबंधित पक्षांकडून पुढे काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.