

बीड : उदय नागरगोजे
बीडची बारामती करणार... असा प्रचार गेल्या अनेक वर्षांपासूनच्या निवडणुकांमधून केला जात असे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांबरोबरच थोरले आणि धाकले पवार देखील बीडकरांना असे आश्वासन द्यायचे. बीडच्या जनतेनेही पवारांच्या या प्रचारावर वारंवार विश्वास ठेवत राष्ट्रवादीला मतदानही केले... पण बीडची बारामती काही झाली नाही... गत विधानसभा निवडणूकीनंतर मात्र निर्माण झालेल्या परिस्थितीत थेट मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणी केली जात होती... परंतु महायुतीच्या जागावाटपानुसार बीडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते स्विकारले...
स्वतः अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्याने बीडकरांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्नही अजित पवारांनी अगदी अटोकाटपणे केला. बीडमध्ये टाटाच्या सहकार्यातून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, तारांगण, सहकार भवन, महसूल भवन केवळ मंजुरच केले नाही तर त्याचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी निधीही मंजूर केला.
अनेक वर्षांपासून रखडलेली नगर-बीड- परळी रेल्वे बीडपर्यंत सुरु करण्यासाठीही मोठा हातभार लावला. एकूणच अजितदादांच्या कार्यकाळात बीडकरांना आता खरोखरच बीडची बारामती होणार अशी अपेक्षा निर्माण झाली होती आणि बीडचा त्या दिशेने प्रवास देखील सुरु होता... परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
बारामती येथे विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. अजित पवारांच्या अपघाती निधनाने एक विकासाभिमुख दृष्टी असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. या घटनेमुळे बीडकरांनाही मोठा धक्का बसला. अजित पवार हे पालकमंत्री असल्याने बीडच्या विकासाचे प्रश्न थेट मार्गी लागत होते, अगदी मुंबईतून बीडकडे निघतांना महत्त्वाच्या प्रश्नांवर अजित पवार सूचना करायचे आणि ते बीडमध्ये पोहचेपर्यंत ते प्रश्न मार्गी लागलेले असायचे. विकासाचे प्रश्न सोडवण्याची अशी गती बीडकरांनी पूर्वी कधीच अनुभवलेली नव्हती. परंतु दादांच्या निधनामुळे ही प्रक्रिया काहीशी संथ झाल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली. त्याबरोबरच पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अजित पवारांप्रमाणेच बीडच्या विकासाची गती त्यांनी राखावी अशी अपेक्षा सर्वसामान्य बीडकरांची आहे. अजित पवार हे व्यस्त कार्यक्रमातून महिन्यातून किमान एक दौरा तरी बीडला करायचे, संपूर्ण दिवस ते विविध ठिकाणी भेटी देत, सर्वसामान्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना सूचना करायचे. परंतु त्यांच्या पश्चात पालकमंत्रीपद स्विकारलेल्या सुनेत्राताईंकडून तशीच अपेक्षा आहे.
प्रशासकीय पातळीवर बीडच्या विकासाचा आढावा त्या घेत असतीलही, परंतु थेट बीडमध्ये येवून अद्याप त्यांनी एकही बैठक घेतलेली नाही. अजित पवारांच्या निधनाचे दुःख पवार कुटूंबाप्रमाणेच बीडकरांनाही आहे. त्यातून बीडकरही अद्याप सावरलेले नाहीत, पण त्याच अजित पवारांनी दाखवलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.
विकासकामांचा आढावा कोण घेणार?
स्व.अजित पवार पालकमंत्री असतांना विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सोपवून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागत होती. दुसऱ्या दौऱ्यात पवारांकडून त्याचा आढावा घेतला जायचा. यामुळे कामात गती होती. आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत याची जाणीव सर्व विभागाच्या प्रमुखांना होती, त्यामुळे प्रशासनात गतीमानता आली होती. परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर विकासकामांचा आढावा सुनेत्रा पवार यांनी घ्यायला हवा, यामुळे कामाची सद्यस्थिती समोर येईल, तसेच अधिकारी देखील वेगाने काम करतील, अशी अपेक्षा आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली. त्याबरोबरच पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अजित पवारांप्रमाणेच बीडच्या विकासाची गती त्यांनी राखावी अशी अपेक्षा सर्वसामान्य बीडकरांची आहे. अजित पवार हे व्यस्त कार्यक्रमातून महिन्यातून किमान एक दौरा तरी बीडला करायचे, संपूर्ण दिवस ते विविध ठिकाणी भेटी देत, सर्वसामान्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना सूचना करायचे. परंतु त्यांच्या पश्चात पालकमंत्रीपद स्विकारलेल्या सुनेत्राताईंकडून तशीच अपेक्षा आहे.