Sunetra Pawar : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याच्या सूचना
Sunetra Pawar Beed Visit
Sunetra Pawar Beed Visitpudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड :राज्यातील बीडसह ३०५ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असताना, या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला सरकार एकटे पडू देणार नाही. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत ही अंतिम नसून, यापुढेही शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे, अशी ग्वाही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

बीड येथे पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजि त जाहीर सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत होत्या. या सभेला पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, उमेदवार आ. सतीश चव्हाण, आ. मनोज कायंदे, माजी आमदार भीमराव धोंडे, संजय दौंड, बाळासाहेब आजबे, जयवंतराव जाधव, ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कल्याण आखाडे, रविकांत राठोड, ॲड. सुभाष राऊत, नासीर काझी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Sunetra Pawar Beed Visit
Kamakshi Devi Temple Road : शंभू महादेव फाटा - कामाक्षी देवी रस्ता करा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बँका, सहकारी पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसंदर्भातही निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना मदत म्हणून पाच हजार रुपये जाहीर केले आहेत. मात्र, ही मदत अंतिम समजू नये. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून यापुढेही शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच सतीश चव्हाण यांना 18 वर्षांच्या कामाचा दांडगा अनुभव असून, गेल्या सहा वर्षांतील त्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. मराठवाड्यातील प्रश्नांची त्यांना जाण असून, पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे. माझा जन्म मराठवाड्यातील धाराशिव माझी जन्मभूमी असली तरी बीड माझी कर्मभूमी आहे.

Sunetra Pawar Beed Visit
MHADA Builder Fraud Case : ग्राहकांना फसवणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका

स्वर्गीय अजितदादांचे बीड जिल्ह्यावर आणि बीडच्या जनतेचे दादांवर असलेले प्रेम व विश्वास आजही कायम आहे. तो विश्वास आणि प्रेम जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दादांनी पाहिलेली स्वप्ने आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी त्यांचा विचार घेऊन पुढे जात आहे असे त्यांनी सांगितले.

तर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पदवीधर मतदारांनी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. विचाराने परिपक्व आणि पदवीधरांचे प्रश्न समजून घेणारा उमेदवार आपल्याला मिळाला आहे. प्रत्येक पदवीधरापर्यंत पोहोचून त्याचे मत मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत,असे त्या म्हणाल्या. पदवीधरांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगत, बीड जिल्ह्यातील पदवीधरांनी पशुसंवर्धन व संबंधित उद्योगांतून स्वावलंबी व्हावे, हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रावहिनी पवार यांना दुष्काळाची जाणीव असून त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यवेळी आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, माजी आ.भीमराव धोंडे, अनिल जगताप, शंकर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सभेला पदवीधर मतदार उपस्थित होते.

१८ वर्षांच्या कामाची पोचपावती द्या : सतीश चव्हाण

महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, बीड जिल्ह्याचे प्रेम आणि येथील जनतेचे सहकार्य नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. स्वर्गीय अजितदादांची उणीव कायम जाणवणार असली, तरी त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे. मी आमदार झाल्यानंतर जात, धर्म किंवा पक्ष न पाहता माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला. गेली १८ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातच शिक्षण घ्यावे आणि त्यांना येथेच रोजगार मिळावा, हे माझे स्वप्न आहे. पदवीधर मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन मला पुन्हा काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news