

Sumitkumar Bharsakar Selection In Indian Team
माजलगाव : थायलंड येथे २६ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या २० वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात पै. सुमितकुमार भारस्कर यांची निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे झाल्याने माजलगावसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २ जून २०२६ रोजी भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) प्रशिक्षण केंद्र, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मारुंजी येथील अमोल बुचडे कुस्ती अकादमीचा खेळाडू पै. सुमितकुमार भारस्कर याने ७० किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले.
निवड चाचणीच्या पहिल्या फेरीत सुमितकुमारने उत्तर प्रदेशच्या रवी कुंतल याचा ९-३ अशा गुणफरकाने पराभव केला. त्यानंतर अंतिम फेरीत हरियाणाच्या नरेंद्र याच्याविरुद्ध झालेल्या लढतीत ७-१ अशा दिमाखदार विजयासह त्याने भारतीय संघात निवड मिळवली.
सुमितकुमार गेल्या सहा वर्षांपासून अमोल बुचडे कुस्ती अकादमीत सराव करत असून महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद पै. अमोल (भाऊ) बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जडणघडण झाली आहे. त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने लखनऊ येथील भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात विशेष सराव शिबिर सुरू करण्यात आले आहे. सुमितकुमार आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व देशासाठी पदक जिंकण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, असा विश्वास वस्ताद पै. अमोल (भाऊ) बुचडे यांनी व्यक्त केला.
पै. सुमितकुमार भारस्कर यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच प्रशिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. पै. अमोल बुचडे, प्रा. किसन बुचडे, पै. विनोद गोरे, पै. समीर देसाई, पै. उत्कर्ष काळे, कोच नरेंद्र कुमार, अनिराज सुभेदार, हितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, प्रा. महेश घुले आणि प्रा. संतोष पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.