

Sugarcane harvesting halted due to unseasonal rains; 'The harvest stopped, the season was prolonged'
गजानन चौकटे
गेवराई : दिवाळीनंतर राज्यभरातील अनेक साखर कारखान्यांचा धुरळा पेटून गळीत हंगामाला सुरुवात झाली होती. गावागावातून ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल होऊन शेतांमध्ये कामाला सुरुवात झाली होती. मात्र, विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावताच "कोयता थांबला, हंगाम लांबला" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस बरसत असून, सकाळी ऊन आणि दुपारी पाऊस अशा वातावरणामुळे शेतात पाणी साचले आहे. ऊस भिजल्याने तोडणी थांबवावी लागली असून, याचा थेट परिणाम साखर गाळप हंगामावर झाला आहे. हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता शेतकरी आणि कारखानदार या दोघांनाही चिंतेत टाकणारी आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यात आता ऊसतोडणी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने या वर्षी गाळप हंगामाची सुरुवात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे निर्देश दिले असले तरी सध्याच्या हवामानामुळे तोडणी थांबल्याने गाळप उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे तोडलेला ऊसही शेतात पडून राहतो आहे. त्यामुळे ऊस सडण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
पाण्याखाली गेलेल्या उसावर कीड व रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हालही वाढले आहेत. हे मजूर पाचट, ताडपत्री किंवा कापडांच्या झोपड्यांमध्ये राहतात. पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये शिरल्याने त्यांचे धान्य, कपडे, आणि इतर साहित्य भिजले आहे. काही मजुरांना झोपण्यासाठी ट्रॅक्टरखाली किंवा शाळांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.
पावसामुळे तोडणी बंद झाल्याने मजुरांच्या रोजगारावर परिणाम झाला असून, रोजंदारी बंद पडल्याने त्यांच्या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पावसात भिजलेल्या गुरांचे हाल पाहून मजुरांचे डोळे पाणावले आहेत. अवकाळी पावसाने ऊसतोडणीसह साखर हंगामावर विरजण घातले आहे. शेतकरी, कारखानदार आणि ऊसतोड मजूर हे तिघेही या पावसामुळे चिंतेच्या छायेत सापडले असून, "कोयता थांबला, हंगाम लांबला" ही परिस्थिती आता प्रत्यक्षात आली आहे.