

Students' dangerous journey for education
अतुल शिनगारे
धारूर : आमचं मूल परत येईल ना शाळेतून ? हा प्रश्न दररोज सकाळी भंडारे वस्तीतील पालकांच्या मनात घर करून असतो. कारण त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत पोहोचण्यासाठी ज्या मार्गाने जातात, तो मार्ग नाहीच, तो एक मोठा ओढा आहे, घनदाट झाडी आणि चिखलाने भरलेली वाट ! धारूर तालुक्यातील धुनकवड क्र. २ येथील जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी भंडारे वस्तीतील जवळपास २० विद्यार्थ्यांना दररोज या धोकादायक मार्गाचा सामना करावा लागतो.
विशेषतः पावसाळ्यात हा ओढा पुराच्या पाण्याने भरून वाहतो आणि या विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणजे जीवावरचा खेळ ठरत असून गेल्या अनेक महिन्यांपासून ही जीव घेणी कसरत हे विद्यार्थी निमूटपणे सहन करत आहेत. शासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, एवढ्याशा सुरक्षित रस्त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कानाडोळा का केला आहे, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत.
शाळा हाकेच्या अंतरावर असूनही, आमच्या लेकरांना प्राणाशी खेळत रस्ता ओलांडावा लागतो. उद्या एखादी दुर्घटना झाली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपस्थित केला आहे.
या वस्तीतील पालक, ग्रामस्थ यांचा संयम सुटू लागला असून त्यांनी तीव्र शब्दांत प्रशासनाला इशारा दिला आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही वाट्टेल ते सहन करतो, पण त्यांच्या जीवाशी खेळ माफ नाही, असा थेट इशारा देत त्यांनी लवकरात लवकर पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा या निष्क्रियते विरोधात वस्तीतील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.