

केज: केज तालुक्यातून एक चोवीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. आपल्या दिवंगत भावाच्या पुण्यतिथीसाठी मूळ गावी आलेल्या या तरुणीच्या अचानक गायब झाली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी पनवेल येथील एका वितरण कंपनीत नोकरी करते आणि गेल्या चार वर्षांपासून आपल्या आईसोबत तिथेच राहत होती. १७ जुलै रोजी आपल्या भावाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी ती आईसोबत केज तालुक्यातील आपल्या गावी आली होती.
दुसऱ्या दिवशी, १८ जुलै रोजी, तिची आई केजच्या बाजारात खरेदीसाठी गेली होती. मात्र, त्या परत आल्यानंतर त्यांची मुलगी घरातून गायब असल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली, पण तिचा काहीही पत्ता लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणीची उंची साडेपाच फूट, रंग: सावळा, बांधा: मध्यम, पोशाख: जीन्स पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचा टॉप, विशेष ओळख: गळ्यात सोन्याची चेन, बारीक काळे केस असे वर्णन करण्यात आले आहे.
या घटनेनंतर तरुणीच्या आईने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या वर्णनाची तरुणी कुठेही आढळल्यास किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ केज पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.