

Stones were thrown at the car of OBC leader Mangesh Sasane.
धारूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धारूर घाटात दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली. धारूर घाटातील म्हसोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला असून, या दगडफेकीत ससाणे यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यातून ससाणे थोडक्यात बचावले आहेत.
ओबीसी कार्यकर्ते पवन करवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात माजलगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन मंगेश ससाणे हे केजकडे परतत होते. यावेळी धारूर घाटात अचानक समोरून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर सात ते आठ दगड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. दगडफेक करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेनंतर मंगेश ससाणे यांनी तत्काळ धारूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी (दि. 15) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास धारूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे करीत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे.