

बीडः पारधी समाजातील महिलेने इतर जातीत लग्न केल्यानंतर जात पंचायतीचे पैसे भरावे लागतात, ते न भरल्याने बीडमधील चऱ्हाटा फाटा भागातून एका तरुणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत त्याचे अपहरण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रातोरात तपास करत धाराशिव जिल्ह्यातून आठ पुरुषांसह एका महिलेला अटक करत या तरुणाची सुटका केली. हा प्रकार जात पंचायतीत पैसे न भरल्याच्या कारणातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागनाथ नन्नवरे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नागनाथ याची पत्नी दिया नन्नवरे (रा.बांगरनाला, गोरेवस्ती, ता.जि.बीड) हीने दिलेल्या तक्रारीवरुन संतोष कंठीलाल पवार, राम कंठीलाल पवार (रा.जामखेड, जि.अहिल्यानगर), प्रशांत अरफान चव्हाण (रा.पाथर्डी) यांच्यासह अकरा अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडताच गांभीर्य ओळखत बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांच्यासह पथकाने नागनाथ नन्नवरे यांचा शोध सुरु केला होता. त्यांना धाराशिव जिल्ह्यात अंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागनाथ याला नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रातोरात त्या वस्तीवर जावून नागनाथ याची सुटका केली. या प्रकरणी आठ पुरुषांसह एका महिलेला अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
संबंध मिटवायचे असतील तर पैसे द्या
दिया नन्नवरे हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2011 मध्ये आई वडीलांच्या संमतीने संतोष कंठीलाल पवार यांच्याशी विवाह झाला होता. परंतु तो दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने नेहमी त्रास देत होता. या दरम्यान नागनाथ नन्नवरे याच्याशी प्रेमसंबंध जुळल्याने ती गेल्या अकरा वर्षांपासून बीडमध्ये राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी दियाचा पुर्वीचा दिर राम पवार हा दियाच्या आईकडे जामखेडमध्ये गेला व आता आमच्यासोबत दियाचा काही संबंध नाही, परंतु तुम्हाला आमच्या सोबत संबंध कायमचे मिटवायचे असतील तर पैसे देवून मिटवून घ्या, पैसे नाही दिले तर दिया व नागनाथ या दोघांना उचलून नेऊ अशी धमकी दिली होती.
पोलिसांकडून तपास सुरु
दिया नन्नवरे हीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. हा प्रकार जात पंचायतच्या कारणातून घडला आहे का, या दिशेने देखील पोलिस तपास करत आहेत.