Beed Crime News : सोनपेठ घरकुल घोटाळ्यातील अभियंत्याचा अपघाती मृत्यू: 'घात' की 'अपघात'? चर्चेला उधाण

या अपघाताबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही...
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगर परिषदेच्या बहुचर्चित 'प्रधानमंत्री आवास योजना' (घरकुल) घोटाळ्याशी संबंधित असलेले अभियंता सागर विजयकुमार देशपांडे यांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. केज नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यासोबत मुंबईला जात असताना, केज तालुक्यातील मस्साजोग येथे जेवणासाठी थांबले असता एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारादरम्यान अंबाजोगाई येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा केवळ अपघात आहे की घातपात, या शंकेने खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर अपघाताची अद्याप केज पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नाही.

Accident
Sonpeth Municipal Council | सोनपेठ नगरपरिषदेत २.५८ कोटींच्या घरकुल निधी अपहारप्रकरणी गुन्हा

नेमका काय आहे सोनपेठ घरकुल घोटाळा?

११ ऑगस्ट २०२५ रोजी म्हाडाच्या दक्षता व सुरक्षा कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. सिटी लेव्हल टेक्निकल सेलचे अभियंता सागर देशपांडे यांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की, सोनपेठ नगर परिषदेने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावयाचा २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी नियमबाह्यपणे इतर खात्यांवर वळवून त्याचा अपहार केला. वारंवार सूचना देऊनही हा निधी परत न केल्याने शासनाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

Accident
Jalana News | अवैध मांसविक्री आणि गोसेवकांवरील हल्ला: सिंदखेडराजा मध्ये तीव्र पडसाद, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी म्हाडाचे दक्षता व सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विष्णू राठोड यांच्या तक्रारीवरून, २ जुलै २०२६ रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४०९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयाचे धुमशान: घातपाताची शक्यता का वर्तवली जात आहे?

गुन्हा दाखल आणि अपघाताची वेळ:

ज्या दिवशी (२ जुलै २०२६) देशपांडे यांच्यावर सोनपेठ येथे गुन्हा दाखल झाला, त्याच दिवशी अवघ्या सात तासांत त्यांचा 'अपघात' झाला, ही योगायोग मानण्यास अनेकांनी नकार दिला आहे.

समान कार्यपद्धती:

केज नगर पंचायतीमध्येही मे २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ४ कोटी २४ लाख रुपयांचा असाच घरकुल घोटाळा उघडकीस आला असून, त्याप्रकरणी मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या तक्रारीवरून ६ जणांवर गुन्हा दाखल आहे. सोनपेठ आणि केज या दोन्ही ठिकाणच्या घोटाळ्यांचे स्वरूप सारखेच असल्याने चौकशीच्या रिंगणात असलेल्या अभियंत्याचा मृत्यू संशयास्पद वाटत आहे.

पोलीस नोंदणीत विलंब:

मृत अभियंत्यासोबत असलेले केज नगर पंचायतीचे कर्मचारी यांनी संबंधित वाहनाचा नंबर आणि चालकाची माहिती पोलिसांना दिली असल्याचे समजते. तरीही, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गित्ते करत आहेत. या अपघाताचा तपास पारदर्शक होऊन सत्य बाहेर येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news