

Son-in-law Assaulted in Washi Beed
केज : पत्नीला माहेरी पाठविण्यास नकार देणाऱ्या जावयाला त्याचा सासरा आणि मेव्हण्याने बदडून काढले. ही घटना दि. २९ एप्रिलरोजी पारा येथे (ता. वाशी, जि. धाराशिव) घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पारा (ता. वाशी) येथील अमोल अशोक शिंदे हे जाधव जवळा येथे काम करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्नी, आई- वडील आणि भाऊ असा परिवार एकत्र राहत आहेत.
दरम्यान, दि. २९ एप्रिलरोजी अमोलची पत्नी मनीषा हिने तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, तिला माहेरी जाण्यासाठी अमोल याने नकार दिला. त्यामुळे मनीषा हिने तिच्या माहेरी संपर्क साधून नवरा माहेरी जावू देत नसल्याची माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच मनीषा हिचे वडील गंगाराम अण्णा फुलारे, भाऊ राहुल फुलारे आणि चुलत भाऊ सुरेश शंकर फुलारे, संदीप शंकर फुलारे यांनी अमोल यांना दगडाने मारहाण केली. तसेच अमोल याचे वडील अशोक शिंदे यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
अमोल शिंदे यांच्या तक्रारीवरून गंगाराम आण्णा फुलारे, राहुल गंगाराम फुलारे, सुरेश शंकर फुलारे आणि संदीप शंकर फुलारे या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुटे पुढील तपास करीत आहेत.