

'Sleep-in' Protest Staged Outside Mahavitaran Office
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनतेची झोप उडालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आष्टी महावितरण कार्यालयात अनोखे आंदोलन करीत तीन तास ठिय्या मांडून झोप काढो आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात सहायक अभियंता अनिकेत महाजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, आष्टी आणि परिसरातील गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे थोडीही हवा वादळ अथवा पाऊस झाला की वीजपुरवठा तासन्तास खंडित होते.
रायगव्हाण आणि फुलवाडी येथे लोडशेडिंग घेणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. वारंवार तक्रारी करून ही दुर्लक्ष केले जात आहे. रायगव्हाण फुलवाडी येथील लोडशेडिंग घेण्याचे कारण त्या ठिकाणचे फीडर सब स्टेशनचे काम सदरील एजन्सीने पूर्ण न केल्याने सदरील एजन्सी जनतेला वेठीस धरत आहे. या एजन्सीवर कारवाई करण्यात यावी तसेच रायगव्हाण, ब्राह्मण वाडी भगवानबाबा नगर, येथील फिडरची कामे करावी.
रायगव्हाण येथे मंजूर झालेले ३३ केव्ही सब स्टेशनचे काम तत्काळ पूर्ण करावे. आष्टी ३३ केव्ही मंडळात कर्मचारी संख्या वाढवावी. आष्टी येथे उपविभाग मंजूर करण्यात यावा अथवा आष्टी विद्युत पुरवठा दोन सब स्टेशनमध्ये डिव्हाइड करावा.
आष्टी गावातील मेंटेनन्सचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, हनुमंत मोरे, चोखाजी सौंदर्य, गणेश वैद्य, जमिर शेख, अलिम शेख, बाबासाहेब फुलारी, आर्दीसह आष्टी फुलवाडी रायगव्हाणसह परिसरातील गावकरी उपस्थित होते.
प्रयत्न सुरू
याबाबत सहायक अभियंता अनिकेत महाजन यांनी म्हणाले की, आष्टी शहरात रोहित्र मेंटेनन्स उच्च दाब वाहिनीचे मेंटेनन्स व लघुदाब वाहिनीचे मेंटेनन्स व आदी मेंटेनन्ससाठी विविध एजन्सीमार्फत काम करून घ्यावे लागते. आमच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून महावितरण ग्राहकांना सुरळीतपणे वीजपुरवठा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.