Lalit traditional folk art : डिजिटल युगात लोककलेचा हुंकार

सिरसाळ्याचे लळीत ठरतेय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा दीपस्तंभ
Lalit traditional folk art
Lalit traditional folk artpudhari photo
Published on
Updated on

प्रा. रवी जोशी

परळी वैजनाथ : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक पारंपरिक लोककला काळाच्या पडद्याआड जात असताना, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ग्रामस्थांनी मात्र आपला दोन शतकांचा सांस्कृतिक वारसा केवळ जिवंतच ठेवला नाही, तर तो अधिक जोमाने बहरला आहे. निमित्त होते, श्रीराम जन्मोत्सव सप्ताहातील पारंपरिक ‌‘लळीत‌’ कार्यक्रमाचे.

एकेकाळी ग्रामीण महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा आणि प्रबोधनाचा मुख्य स्रोत असलेल्या लळीत आणि सोंगी कला आता क्वचितच पाहायला मिळतात. मात्र, सिरसाळ्यातील देशमुख गल्लीतील शिवराम मंदिर परिसरात साजरा झालेला हा सोहळा अशा लोप पावत चाललेल्या कलांना पुनर्जीवित करण्याचा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे.

Lalit traditional folk art
Somnath Temple | सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांची अढळ श्रद्धा

“आमची ही कला केवळ मनोरंजन नाही, तर तो आमच्या पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक ठेवा आहे. आजची पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, त्यांना आपल्या मातीतील विविध पात्रांची ओळख व्हावी, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, अशी भावना स्थानिक आयोजकांनी व्यक्त केली.

Lalit traditional folk art
राजमाता जिजाऊ : तेजःपुंज कर्तृत्व

विविधतेतून एकतेचे दर्शन

या लळीताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बहुसांस्कृतिकता. या सोहळ्यात केवळ धार्मिक विधी न होता, समाजातील विविध घटकांचे हुबेहूब चित्रण केले जाते यात गोसावी, मारवाडी, तेलंगी ब्राह्मण, बैरागी, नानकशाही, सिद्धी, वाघ्या-मुरळी, पोतराज, आराधी आणि फकीर या सर्व घटकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरत आहे.

या सर्व समाज घटकांची भाषा, वेशभूषा आणि त्यांच्या चालीरीती जिवंत संवादांच्या (पद्य-संवाद) माध्यमातून मांडल्या जातात. याबरोबरच यातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा असून ही सोंगे सादर करताना सामाजिक एकता आणि सलोख्याचा संदेश दिला जातो, जो आजच्या काळाची गरज आहे.

सामाजिक एकतेचा संगम : वारसा नव्या पिढीच्या हाती

या सोहळ्याचे यश यातच आहे की, यात केवळ ज्येष्ठ कलाकारच नाहीत, तर लहान मुले आणि तरुण पिढीचाही सक्रिय सहभाग आहे. “ही परंपरा आमची, जबाबदारी आमची!” या जिद्दीने नवीन पिढी रंगमंचावर उतरली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात गेलेले तरुणही या दिवशी गावाकडे परततात, हे या लोककलेवरील प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.

सिरसाळ्यातील हे लळीत केवळ एक कार्यक्रम उरलेला नाही, तर तो लोककलेचा जिवंत वारसा झाला आहे. आधुनिकतेच्या लाटेत आपली मुळे घट्ट पकडून ठेवणाऱ्या या ग्रामस्थांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा हा त्रिवेणी संगम पाहून, ही लोककला कधीही लोप पावणार नाही, उलट ती अधिक समृद्ध होत राहील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news