

डॉ. वि. ल. धारुरकर
राजमाता जिजाऊंचे कर्तृत्व मध्ययुगीन भारताला नवी दिशा देणारे ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उत्तुंग ध्येयवाद, आदर्श मातृशक्ती तसेच अजोड व्यवस्थापन कौशल्य या त्रिगुणांचा अद्भुत संगम झालेला होता. आज त्यांची जयंती.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मुघलांच्या आणि दक्षिणेतील बहामनी साम—ाज्याची शकले झालेल्या पाच शाह्यांच्या अन्याय आणि जुलमांनी रयत त्रस्त झाली होती. अशा अंधारलेल्या काळोखात प्रकाशाचे तेजस्वी सूर्यबिंब उदयास आले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने. या तेजस्वी महासूर्यास आकार देण्याचे, संस्कारित करण्याचे आणि एखाद्या कुशल शिल्पकाराप्रमाणे घडविण्याचे कार्य ज्या विभूतीने केले, त्या महान विभूतीचे नाव राजमाता जिजाऊ.
जिजाऊंचा जन्म सिंदखेडराजा या गावाजवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाऊंनी 1598 ते 1674 या आपल्या 75 वर्षांच्या आयुष्यात भारतीय इतिहासाला ज्या पद्धतीने विलक्षण कलाटणी दिली आणि ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली ते कार्य इतिहासात अमर ठरले आहे. या कार्याचे महत्त्व प्रामुख्याने तीन अंगाने अधिक स्पष्ट करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे दक्षिणेतील निजामशाही, आदिलशाही आणि उत्तरेतील मुघल यांची अस्मानी, सुलतानी संकटे महाराष्ट्रावर चालून आली असताना, या संकटांशी मुकाबला करण्यासाठी योजतत्त्व, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र विकसित करण्यासाठी त्यांनी शिवरायांना तत्त्व आणि सिद्धांत तसेच व्यवहार करण्याची दिशा दिली.
एक राष्ट्रमाता आपल्या पुत्रावर कोणते संस्कार करू शकते आणि त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करू शकते आणि त्यास कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने व्यूहरचना करावी याचे शिक्षण देऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ होय. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उत्तुंग ध्येयवाद, आदर्श मातृशक्ती तसेच अजोड व्यवस्थापन कौशल्य या त्रिगुणांचा अद्भुत संगम झालेला होता. माणसांची पारख तसेच संकटकाळात मात करण्यासाठी लागणारे धैर्य आणि साहस यामुळे त्यांना प्राप्त झालेली दिव्यद़ृष्टी त्यांनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली आणि इतिहासाला कलाटणी दिली. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी ‘शिवाजी दी ग्रेट’ या नावाचे तीन खंड प्रकाशित केलेले आहेत. डॉ. बाळकृष्ण यांच्या पहिल्या खंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनशिल्प कोरण्यात जिजाऊंनी घडवलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे, ही गोष्ट प्रामुख्याने नमूद केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वचरित्रकार, मग ते यदुनाथ सरकार असोत, रियासतकार गोविंद सखाराम देसाई असोत, या सर्वांनीच शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बजावलेल्या कार्यावर विशेष प्रकाश टाकलेला आहे.
रायरेश्वर येथे शिवरायांनी स्वराज्याच्या उभारणेची घेतलेली शपथ इथपासून ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या वाटचालीत प्रत्येक क्षणात, प्रत्येक घटनाक्रमात प्रत्येक वादळातून बाहेर पडण्यासाठी जिजाऊंनी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे शिवरायांना प्रेरक अशी वाट दाखवण्याचे कार्य केलेले आहे. जिजाऊंचे खरे कर्तृत्व दिसून येते ते पुणे शहराच्या प्रारंभिक व्यवस्थापनाच्या रचनेमध्ये आणि मांडणीमध्ये. शहाजी महाराजांनी पुणे, सुपे, इंदापूर हा सारा परिसर म्हणजेच पुण्याची जहागीर जिजाऊंकडे सोपवली. शिवरायांच्या संगोपनाची जबाबदारीही जिजाऊ तन्मयतेने पार पाडत होत्या. प्राचीन शास्त्रातील तत्त्वज्ञान आणि विशेष करून राजनीतिशास्त्राबद्दलचे मौलिक धडे जिजाऊंनी शिवरायांना दिले. पुण्यात जिजाऊंनी केलेले कार्य खरोखरीच स्वराज्याची पायाभरणी करणारे ठरले. निजामशाहीमध्ये रयतेची कोंडी होत होती, अन्याय-अत्याचाराला सीमा उरल्या नव्हत्या, शेतकर्यांचे शोषण होत होते; अशा काळात सोन्याचा नांगर प्रतीकात्मक स्वरूपात घेऊन त्या नांगराने पुणे परिसरातील जमीन नांगरून या भूमीचा जिजाऊंनी उद्धार केला.
दुष्काळात शेतकर्यांना चारा माफ करणे असो किंवा कल्याणकारी योजना असोत, शेतकर्यांना साहाय्य असो, या सर्व बाबतीत जिजाऊंनी शिवरायांना मार्गदर्शन करून पुण्याची प्रशासकीय घडी सुस्थितीमध्ये आणली आणि चोख प्रशासनाचा नवा आदर्श घालून दिला. आज पुण्याचा विचार देशातील प्रमुख महानगरांमध्ये होत आहे; पण त्याला पहिले अधिष्ठान जिजाऊंनी दिले, हे विसरून चालणार नाही. तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण उभारले. शिवरायांना मानसिक द़ृष्टीने आणि स्वपराक्रमाने तयार करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. त्यासाठी युक्ती, मुत्सद्देगिरी, नियोजन अशा सर्व उत्तमोत्तम गुणांचा उपयोग करून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला.
प्रा. नरहर कुरुंदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की, या काळात थिअरी ऑफ पर्क्योलेशन म्हणजे हळूवारपणे स्वराज्याचे सूत्र आणि रयतेसाठीच्या योजना तळागाळापर्यंत विस्तारत जाण्यास सुरुवात झाली. यासाठीचे सर्व दिशादर्शन जिजाऊंनी शिवरायांना केले. अफजल खानासारख्या शत्रूला गनिमी काव्याने जेरीस आणण्याची शिवाजी राजांची युद्धनीती बहुलोकप्रिय आणि यशस्वी झाली. या युद्धतंत्राचे शिक्षण जिजाऊ अगदी बालवयापासून त्यांना देत होत्या. जिजाऊ या स्वतः उत्तम घोडेस्वार होत्या. तलवारबाजीतही निपुण होत्या. जिजाऊंनी शिवरायांंना एकाहून एक धाडसी निर्णय घेण्यास प्रोत्साहन देताना, त्यांची पूर्तता करण्यासाठीचे धैर्यही शिकवले. आगर्यातून सुटकेनंतर बैराग्याच्या वेशात महाराज जेव्हा रायगडावर पोहोचले, तेव्हा जिजाऊंचा पदस्पर्श करताच मातेच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागल्या.
याचे वर्णन करताना यदुनाथ सरकार लिहितात- स्वराज्य मातृभूमीत परतले होते. सारा महाराष्ट्र रोमांचित झाला होता. ती खर्या अर्थाने स्वातंत्र्याची मुक्ती होती. सईबाईंच्या निधनानंतर संभाजी महाराजांचे संगोपनही जिजाऊंनी केले. संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वावर, जडणघडणीवर जिजाऊंची अमिट छाप जाणवते.जिजाऊंनी स्वराज्याची भक्कम उभारणी तर केलीच; पण त्याचबरोबर स्वराज्यावर आलेल्या संकटांशी सामना करण्यासाठीचे मनोधैर्यही दिले. राज्याभिषेकाचा मंगल क्षण पाहिल्यानंतर अल्पावधीतच जिजाऊंचे महानिर्वाण झाले. ‘भक्तिशक्तीच्या गुढी उभारू, जोवर वाहते गोदामाय, जोवर वाहते कृष्णामायी, तोवर गीत जिजाऊंचे गाऊ’असेच जिजाऊंचे गीत महाराष्ट्र गात राहील, यात शंका नाही. इतिहासाच्या प्रत्येक पानावर जिजाऊंच्या कर्तृत्वाचा आणि शिकवणीचा परीसस्पर्श युगानुयुगे जाणवत राहील.