

Signs of the Kshirsagars uniting within the Beed Municipal Council
बीड, पुढारी वृत्तसेवा : आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झालेल्या बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी आ. विजयसिंह पंडित यांना बीडमध्ये निवडणूकीची रणनिती आखण्याचे अधिकार दिले होते. त्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे या निवडून आल्या, नगरसेवकांची संख्याबळही निर्णायक मिळाले आहे. परंतु अवघ्या आठ महिन्यात राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली असल्याने बीडमध्ये चर्चेला ऊत आला आहे. तर दुसरीकडे आ. संदिप क्षीरसागर व भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याबाबतचे वक्तव्य केल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
बीड नगरपालिका गेल्या पस्तीस वर्षांपासून क्षीरसागर कुटूंबाच्या ताब्यात होती. गतवर्षी झालेल्या नगरपालिका निवडणूकांपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी बीडमध्ये घडल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उमेदवार निवडीमध्ये स्वातंत्र्य मिळत नसल्याचे सांगत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे बीडचे तत्कालिन पालकमंत्री स्व. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील निवडणूकीची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना सोपवली होती.
काही माजी नगरसेवक व काही नवे कार्यकर्ते अशी मिळून टीम तयार करत आ. पंडित यांनी बीडची निवडणूक लढवली. स्व. अजित पवार यांनी बीडमध्ये दोन सभा घेतल्या. आ. पंडित यांनीही जोरदार ताकद या निवडणूकीत लावल्याने नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे या विजयी झाल्या तर १९ नगरसेवक देखील निवडून आले. याबरोबरच युतीमध्ये असलेल्या शिवसेनेलाही ३ जागा मिळाल्या होत्या. इतर काही पक्षांची मदत घेत राष्ट्रवादीने नगरपालिकेत सत्ता स्थापन केली.
सत्ता स्थापनेनंतर सभापती निवडीवेळीच फारुख पटेल है नाराज असल्याचे समोर आले होते. परंतु यावेळी आ. पंडित यांची समजूत काढण्यास यशस्वीही झाले होते. नगरपालिकेच्या माध्यमातून चांगले काम व्हावे अशी बीडकरांची इच्छा होती, त्या दिशेने काम सुरु झाले. परंतु अवघ्या सहा महिन्यात राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले.
यातील स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या स्वच्छता विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एका ठरावाच्या कारणावरुन नगरसेवक अमर नाईकवाडे, गटनेते फारुक पटेल व इतर काही नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. एव्हढ्यावरच ते थांबले नाहीत तर निजाम यांचा खरपूस शब्दात समाचार देखील घेण्यात आला. गटबाजीचे प्रदर्शनहे एव्हढ्यावरच थांबले नाही तर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यावेळी या दोन्ही गटांनी वेगवेगळ्या भेटी घेतल्या.
एकीकडे राष्ट्रवादीतील दोन गट असे विरोधाभासी वक्तव्य करत असतांना राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार पक्षाचे आमदार संदिप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर हे दोन दिवसापूर्वी एका शासकीय कार्यक्रमात एकत्र आले. तेव्हापासून हे दोघे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. या दरम्यान, आता दोघांनीही बीडच्या विकासासाठी गरज पडली तर एकत्र येण्याबाबतचे वक्तव्य केल्याने बीडमध्ये राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.