

Shree Kshetra Gahininath Gad Dindi
आष्टी, पुढारी वृत्तसेवाः श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा यंदाची पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने नतमस्तक होण्यासाठी हजारो भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी मार्गस्थ झाला.
पंढरपूरच्या विठुरायाला एकादशीच्या निमित्ताने T भेटण्यासाठी पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरील समाधी ला नतमस्तक होऊन सुरुवात झाला. विविध ठिकाणी मुक्कामाला ही दिंडी असेल.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आज विविध जाती, धर्म पंथांचे आणि विविध तालुका आणि जिल्ह्यांतील भाविक भक्त एकत्र झाले आणि हरिनामाच्या जयघोषाने या दिंडीला अवघे पंढरीचे वातावरण निर्माण झाले. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा पायी दिंडी सोहळा मार्गस्थ होताना अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
यावेळी बोलताना महंत विठ्ठल महाराज म्हणाले गहिनीनाथ गडापासून वारकरी सांप्रदायाची मूळ परंपरा सुरू झालेली आहे. ती परंपरा पुढे अखंडितपणे सुरू ठेवण्याचे काम केले जात आहे. हा पालखी सोहळा गहिनीनाथ गड ते पंढरपूर यादरम्यान अकरा मुक्काम करतो. एकादशीच्या आधी दोन दिवस हा सोहळा पंढरीत पोहोचलेला असतो.
आषाढी एकादशीला हजारो वारकरी विठुरायाचे दर्शन घेऊन आपली वारी सार्थ ठरवतात. या पालखी सोहळ्याच्या मार्गात रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी आम्ही केली होती, परंतु ती झालेली नाही, परंतु पालखी सोहळ्याला आता या सर्व गोष्टींची सवय झाली आहे.
पालखी अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे महंत विठ्ठल महाराजांनी सांगितले. या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी आलेले हजारो भाविक उपस्थित होते.