

Clerk and engineer caught taking bribe
बीड पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावामध्ये करण्यात आलेल्या भूमिगत नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे व वरिष्ठ लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांना ८० हजार रुपयाची लाच घेताना बुधवारी जिल्हा परिषदेतील त्यांच्या दालनामध्ये पकडले. या प्रकरणात दोघांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे तक्रारदाराने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत भूमिगत नालीचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्याच्या अंतिम बिलाच्या नोटीशीटवर सही करून वरिष्ठांकडे बिल मंजुरीसाठी पाठवण्याकरता मुकुंद आंधळे व किरण कुमार हिवाळे यांनी ८५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचत तक्रारदाराला जिल्हा परिषद कार्यालयात पाठवण्यात आले.
त्या ठिकाणी ८० हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुकुंद आंधळे व किरणकुमार हिवाळे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.