

बीड; पुढारी वृत्तसेवा : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यासाठी सुदर्शन घुले याच्या साथीदाराने नव्याने तयार केलेल्या हत्याराचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले आहे. तसेच हत्यारामुळे मृत्यू होतो का? याचा ३ डॉक्टरांच्या वैद्यकिय पथकाने दिलेला अहवालदेखील दोषारोपपत्रात जोडला आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड गँग आणि सुदर्शन घुलेच्या साथीदारांनी नव्याने तयार केलेल्या ४ हत्यारामुळे मृत्यू होतो का? या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे अहवाल देत या हत्यारामुळे मृत्यू होऊ शकतो, असा अहवाल दिलेला आहे.
गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप या चार हत्यारांच्या साहाय्याने देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या सर्व हत्याराने मृत्यू येऊ शकतो, असा अहवाल वैद्यकीय पथकातील तीन अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी चार प्रकाराची वेगळीच हत्यारे तयार केली होती. देशमुख यांचा मृतदेह ज्यावेळी आढळून आला. त्यावेळी मृतदेहावर दीडशेहून अधिक लहान, मोठे व्रण आढळली होती. बेदम मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अमानुष पद्धतीने क्लच वायर, गॅस पाईप, लोखंडी पाईप तसेच पीव्हीसी पाईपने देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर हे व्रण उमटल्याने संपूर्ण त्वचा काळी निळी पडली होती.