

नाशिक : बहुचर्चित बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सुरू झाल्याने शहर पोलिस सतर्क झाले असून, त्यांनी सोशल मीडियावरील व्हायरल फोटो, व्हिडिओची शहानिशा करण्यासाठी नाशिक रोड परिसरात शोध मोहीम राबविली. मात्र, त्यांना संशयित आंधळे मिळून आला नाही तसेच तो व्हिडिओ आंधळेचा नसल्याचेही निष्पन्न झाले.
सरपंच संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. या हत्याकांडाने राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, राजकीय आरोप- प्रत्यारोपही होत आहेत. या गुन्ह्यात तपास यंत्रणेने संशयितांची धरपकड केली आहे. मात्र, संशयित कृष्णा आंधळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला आहे. दरम्यान, आंधळे नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे नाशिक शहर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबविली. उपनगर पोलिसांनी मुक्तिधाम मंदिरासह आसपासचा परिसर पिंजून काढत शोध घेतला. तसेच, नाशिक परिसरातील हॉटेल्स, लॉजिंगचीही तपासणी करण्यात आली. मात्र, कृष्णा आंधळे आढळून आला नाही, तर पोस्टमधील फोटोचीही शहानिशा केली असता, तो कृष्णा आंधळे नसल्याचे उघड झाले. त्यामुळे ही अफवा असल्याचे पोलिसांनीच स्पष्ट केले आहे.