

Shiv Jayanti celebrations in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात उत्साह, अभिमान आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळाला, शहरासह ग्रामीण भागात अभिवादन, मिरवणुका, व्याख्याने, निबंध स्पर्धा, प्रभातफेरी व रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध संस्था, शैक्षणिक संकुले व ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टाकरवण येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बाजार मैदानात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शालेय विद्याथ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील तब्बल ६०० विद्याथ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेत शिवरायांचा इतिहास शब्दबद्ध केले. गावातील शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयातही अभिवादन कार्यक्रम पार पडले.
धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरणविषयक नीती या विषयावर डॉ. दिनेश कचकुरे यांनी मार्गदर्शन करताना शिवरायांची व्यापक व दूरदृष्टी असलेली पर्यावरण जपणारी धोरणे अधोरेखित केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी शिवरायांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. कार्यक्रम झूम पद्वारे पार पडला.
दिंद्रुड येथे शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच गावातून शिवरायांच्या पालखीची भक्तिमय मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर लेझीम खेळत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. गावातील विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम झाले. शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषेत प्रभातफेरी काढून कार्यक्रमात रंगत आणली.
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना, सुंदरनगर येथेही शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सचिव सुरेश लगड यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
माजलगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यावर्षी पारंपरिक जल्लोष टाळून समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्घाटन जयसिंग सोळंके यांच्या हस्ते झाले.
बीड शहरातील सी. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रनिष्ठा, शिस्त व सर्वधर्म समभाव जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. श्री बंकटस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जयंती कार्यक्रम झाला. डॉ. रामचंद्र गिराम यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समाजदर्शन या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले, अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी शिवरायांच्या विचारांची कृतीत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील विविध भागांत पार पडलेल्या शिवजयंती उत्सवांचे आकर्षक छायाचित्रे वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिवादनासोबतच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांवर दिलेला भर ही यंदाच्या उत्सवाची विशेष नोंद ठरली.
केज येथे जल्लोषात शिव जयंती साजरी केज: केज येथे मोठ्या उत्साह पूर्ण आणि जल्लोषात शिवजयंती डीजे मुक्त वातावरणात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्यदिव्य अशा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ आणि सिंहसनाधिष्टीत मूर्ती आणि प्रचंड जल्लोषपूर्ण बाताबरण व तरुणांचा सहभाग होता, केज येथील वकीलवाडी, हनुमान मंदिर, भवानी चौक, क्रांती नगर, जिजाऊ माता चौक, भवानी माता मंदिर, हनुमान गल्ली, जिजाऊ ब्रिगेड या आठ शिव जयंतीच्या प्रमुख शिवजयंती मंडळांच्या वतीने शिव जयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंती मिरवणुकीत प्रचंड उत्साहात आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ व हत्तीवर अंबारीत बसलेला सिंहासनाधिष्टीत आणि डीजेमुक्त वातावरणात विद्युत रोषणाईत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकली. तसेच मिरवणुकीत हलगी, ढोल, ताशा, संबळ, आदी पारंपरिक वाद्ये आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले शिवप्रेमी देखील होते.
या वेळी केज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहायक पोलिस निरीक्षक वैभव मांजरमे, सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, या अधिकारी व पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गौरी शिंदे यांच्या आईसाहेब प्रतिष्ठान या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी असलेल्या शिव भक्तांना ११ हजार १११, हास्य क्लबच्या वतीने मिरवणुकीतील शिवभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर अत्यंत मोहक आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि स्क्रीन लावले होते. धारूर येथे रक्तदानातून युवकांची समाज-सेवा धारूर : सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारों, नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, भाजपा नेते माधव निर्मळ, तहसीलदार श्रीकांत निळे, पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्यासह नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करून अभिवादन केले.
शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक चांधिलकी जपली. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते प्रा. नितीन शुक्ला यांनी ७५ वे, तर आदर्श शिक्षक सुरेश शिनगारे यांनी ५० वे रक्तदान करून विशेष नोंद केली. दोघांचाही जयंती समितीकडून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.